कोरोना नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महापालिका सज्ज
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.२६ :- कोरोना विषाणूच्या संभाव्य प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. मुंबईतल्या रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी २ हजार ८०४ रुग्णशय्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोरोनाविषयक नियंत्रण कक्षही २४ तास कार्यरत ठेवण्यात येणार आहे.
कोरोना रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात प्राणवायूही उपलब्ध ठेवण्यात आला असून कोरोना चाचण्यांवर भर देण्यात आला आहे. रुग्णांचे सर्वेक्षणही केले जाणार आहे. प्रभाग स्तरावर वॉर रुम सज्ज ठेवण्यात आली आहे. मुंबईत पुन्हा कोरोनाची स्थिती निर्माण झाली तर महापालिकेने काही रुग्णालयांमध्ये रुग्णशय्या राखीव ठेवल्या आहेत.
महापालिकेच्या सेव्हन हिल्स मध्ये १ हजार ७०० तर कस्तुरबा रुग्णालयात ३५, कामा रुग्णालयात १००, सेंट जॉर्ज रुग्णालयात ७० रुग्णशय्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करणे, कोरोना रुग्ण आणि रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण करणे, नियमित RT-PCR चाचणीवर भर देणे, लसीकरण मोहीम प्रभावीपणे पार पाडणे आदी उपक्रम महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत.