प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ
विषय निश्चित करण्यासाठी सोमवारी दिल्लीत बैठक
मुंबई दि.२४ :- प्रजासत्ताकदिनी नवी दिल्लीत होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाचा समावेश असणार आहे. चित्ररथाच्या विषयाबाबत नवी दिल्ली येथे सोमवारी (२६ डिसेंबर) बोलाविण्यात आलेल्या बैठकीत महाराष्ट्रातील अधिकारीही सहभागी होणार आहेत.
प्रजासत्ताकदिनाच्या संचलनात सहभागी होण्यासाठी प्रत्येक राज्याला दर-तीन वर्षांनी संधी मिळते. महाराष्ट्राचा चित्ररथ गेल्या वर्षी सहभागी होता व सर्व राज्यांमध्ये उत्तम चित्ररथासाठी प्रथम क्रमांकही मिळाला. त्यामुळे यंदा महाराष्ट्राला संधी मिळणार नव्हती. पण चित्ररथासाठीच्या विषयांबाबत ध्वनिचित्रमुद्रित सादरीकरण पाठविण्याची सूचना केंद्र सरकारने केली होती.
त्या सुचनेनुसार चार विषय पाठविण्यात आले. महाराष्ट्राला संधी मिळणार नव्हती. त्यामुळे आपण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संपर्क साधला. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव आणि अन्य विषयांचा विचार करावा, अशी विनंती केली होती, असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.