उद्यापासून महाराष्ट्राच्या काही भागात थंडीचा कडाका
मुंबई दि.२२ :- राज्याच्या काही भागांत शुक्रवारपासून थंडीचा कडाका जाणवू शकेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात थंडीची तीव्रता कमी असणार आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक तसेच अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जिल्ह्यात २३ ते २७ डिसेंबरदरम्यान पाच दिवस थंडीची तीव्रता अधिक जाणवणार आहे.
काश्मीर खोरे, हिमाचलमधील अतिथंडी आणि बर्फवृष्टीमुळे पश्चिम राजस्थानच्या वायव्य दिशेकडून सह्याद्री आणि सातपुडा खिंडीतून उत्तर महाराष्ट्रात थंडीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून नाताळदरम्यान तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रात याचा फारसा परिणाम होणार नाही, असा अंदाज आहे. दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मुंबईमध्येही किमान तापमानात किंचित घट झाली आहे. त्यामुळे किमान डिसेंबरअखेरीस मुंबत पुन्हा एकदा थंडीची जाणीव होण्याची शक्यता आहे.
