महानगर गॅस कंपनी महामुंबई क्षेत्रात २९६ नवीन सीएनजी पंप उभारणार
मुंबई दि.२१ :- वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) महामुंबईत नवीन २९६ सीएनजी पंपांची उभारणी करण्याचे ठरविले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने देशात २०३०पर्यंत १८ हजार नवे सीएनजी पंप असतील, असे नियोजन आखले आहे. सध्या महामुंबई क्षेत्रातील हा आकडा ३०० इतका आहे.
देशभरात सध्या ४ हजार ५०० सीएनजी पंप आहेत. ही संख्या १८ हजारांवर गेल्यास सध्याच्या टक्केवारीनुसार, महामुंबईत किमान ९००हून अधिक पंपांची उभारणी आवश्यक असणार आहे. महानगर गॅसने मुंबई व ठाण्यासाठी ५०० चौरस मीटर भूखंडाबाबत अर्ज करण्यास सांगितले आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी व बदलापूर या शहरांमधील तसेच आजूबाजूच्या भागातील मुख्य रस्त्यांवर हे भूखंड असावेत, असे कंपनीने म्हटले आहे.
रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण, उरण, खालापूर, महाड, अलिबाग, रोहा, माणगाव या तालुक्यांमधील विशिष्ट भागांमधील १२२५ चौरस मीटर भूखंडाची मागणी केली आहे. हे अर्ज स्वारस्याची अभिव्यक्ती (ईओआय) या प्रकारात मागविण्यात आले असून त्यासंबंधी अधिक माहिती कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.