शाळांमध्ये सीसीटीव्ही व कॅफेटेरिया परिसरात निर्बंध लावावेत
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी
नागपूर दि.२१ :- शाळेत होत असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शाळेत टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत तसेच शाळा महाविद्यालय परिसरात असलेल्या कॅफेटेरियांवर निर्बंध लावावेत, अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
महाविद्यालय परिसरातील कॅफेटेरियावरील निर्बंध व शाळेतील सीसीटीव्ही लावण्याबाबत दोन सचिवांची समिती स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर दिले. अकोला, बीड सारख्या जिल्ह्यात महाविद्यालय परिसरात असलेल्या कॅफेटेरियामध्ये मुलींबरोबर घडलेले प्रकार दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून यावर कठोर निर्बंध लावण्याची मागणी केली.
गृहमंत्री फडणवीस यांनी विनाअनुदानित शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबत सक्ती करण्याबाबत सूचना केली जाईल व शक्य असल्यास मदत दिली जाईल अशी ग्वाही दिली.तसेच अल्पवयीन मुलींना लैंगिक शिक्षणाबाबत गुड टच बॅड टचचे पोलीस दिदींकडून धडे देण्यात येत आहेत, असे सांगितले.