ठळक बातम्या

नागपूर शासकीय रुग्णालयात व्हेंटीलेटरअभावी तरुणीचा मृत्यू

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारला धारेवर धरले

नागपूर दि.२१ :- आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या नागपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने सतरा वर्षांच्या तरुणीला आई-वडीलांसमोर प्राण सोडावे लागल्याची घटना दुर्दैवी, सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी येथे केली. विधानसभेत केलेल्या लक्षवेधी सूचनेवर पवार बोलत होते. या प्रश्नांवर पवार यांनी सरकारला धारेवर धरले.

या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसे व्हेंटीलेटर उपलब्ध करण्यात यावेत, ते चालू राहतील याची दक्षता घेण्यात यावी, रुग्णालयांमध्ये औषधे व इतर सामग्री उपलब्ध ठेवावी, डॉक्टर व इतर कर्मचारी वर्ग पुरेसा ठेवावा. नवीन रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालय सुरु करताना आधीच्या रुग्णालयातील कर्मचारी वर्गाची पळवापळवी करु नये, डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची भरती तातडीने करण्यात यावी अशा मागण्यही पवार यांनी या वेळी केल्या. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे तसेच व्हेंटीलेटरअभावी होणारे मृत्यू टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

प्रत्येक जिल्ह्यात एक ऑटीझम सेंटर सुरु करा – पवार

ऑटीझम (स्वमग्नता) हा आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मतीमंद आणि स्वमग्न मुले या दोन्हीमध्ये खूप तफावत आहे. स्वमग्न मुलांना सगळ्या उपचार पद्धती एकत्र मिळण्याची आवश्यकता असते. ऑटीझम रुग्णांना जिल्हा पातळीवर तातडीने निदान आणि उपचार मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक ऑटीझम सेंटर सुरु करण्याची आग्रही मागणी विधानसभेचे पवार यांनी केली.
या मागणीवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *