मुंबई दि.२४ :- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकाबाहेरील विकास प्रकल्पांना आणि वर्सोवा-विरार सागरी सेतूला जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जायका)कडून अर्थसहाय्य देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जपानमधील टोकिओ येथे दिली.
फडणवीस यांनी बुधवारी जपानचे पायाभूत सुविधा आणि वाहतूक उपमंत्री निशिदा शोजी यांची भेट घेतली. फडणवीस यांची इस्ट जपान रेल्वे कंपनी, जेआर इस्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यूजी फुकासावा यांच्यासमवेत बैठक झाली. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी इकुजू असामी आणि तकेशी त्सुयोशी हेही यावेळी उपस्थित होते.
बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या अर्थकारणाला मोठी गती मिळणार आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंझो अॅबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात बुलेट ट्रेनची पायाभरणी केली आणि भारत-जपान मैत्रीचा एक नवा अध्याय लिहिला गेला. अतिशय गतीने हे काम सुरू असून कालमर्यादा पाळल्या जात आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांनी जपानमधील शिनकानसेन बुलेट ट्रेनच्या नियंत्रण कक्षालाही भेट दिली.