मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात २५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक
मुंबई, दि. १
बृहन्मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावात पुढील २५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.
मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात तलावातून पाणी पुरवठा केला जातो.
यापैकी उर्ध्व वैतरणा तलावातील वापरण्यायोग्य पाणीसाठा शून्यावर आला आहे. मोडक सागर तलावात २८.८३ टक्के, तानसा तलावात २५.०६ टक्के, मध्य वैतरणा तलावात १०.६७ टक्के पाणी साठा शिल्लक आहे तर भातसा, विहार आणि तुळशी तलावात अनुक्रमे ११.१९, २७.९० आणि ३२.१८ टक्के पाणी साठा शिल्लक आहे.
त्यामुळे पुरेसा पाऊस पडेपर्यंत उपलब्ध पाणीसाठय़ातूनच मुंबईकरांची तहान भागवावी लागणार आहे. बृहन्मुंबईला दररोज ३,८०० दशलक्षलीटर पाणी पुरवठा करण्यात येतो. पावसाळा सुरू झाल्यानंतर सर्व तलाव क्षेत्रात भरपूर पाऊस झाल्यानंतरच तलावांमधील पाणीसाठय़ात वाढ होणार आहे.
दरम्यान महापालिका प्रशासनाने भातसा व उर्ध्व वैतरणा तलावातील राखीवसाठा वापरण्यासाठी राज्य सरकारला पत्र पाठविले आहे. मात्र या पत्रावर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
—
