मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा महाराष्ट्र दिनी व्हावी – अजित पवार
मुंबई दि.२७ :- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ वा वर्धापनदिन आणि मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून, येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केली जावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा,अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्राद्वारे राज्य शासनाकडे केली आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीचा लढा दशकाहून अधिक काळ सुरु आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर विचित्र अपघातात ११ वाहने एकमेकांना धडकली, जीवितहानी नाही
अभिजात भाषेसाठीचे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करत असल्याचे पुरावे तसेच त्यासंदर्भातील तपशीलवार अंतरिम अहवाल महाराष्ट्राच्यावतीने २०१३ मध्ये केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे आणि २०१४ मध्ये अंतिम निर्णयासाठी केंद्रसरकारकडे पाठविण्यात आला. तत्कालीन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने २१ फेब्रूवारी २०२२ रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी यांची भेट घेतली. त्यांनीही महाराष्ट्र सरकारने पाठविलेला पठारे समितीचा अहवाल योग्य असून तो केंद्र सरकारने स्वीकारला असल्याचे स्पष्ट केले होते, असे पवार यांनी या पत्रात म्हटले आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री व आपण उपमुख्यमंत्री असताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी १० जानेवारी, २०१२ रोजी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली.
महापालिकेतर्फे वडाळा आणि घाटकोपर येथे छोट्या नाट्यगृहांची उभारणी
समितीने एकूण सात, तसेच मसुदा उपसमितीने १९ बैठका घेतल्या. तज्ज्ञांशी चर्चा करून प्राचीन ग्रंथांचे संदर्भ, प्राचीन लेख, शिलालेख, ताम्रपट अशा सर्वांचा सखोल अभ्यास करून ४३५ पानांचा अहवाल तयार करून केंद्र सरकारला सादर करण्यात आला. अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक असलेले सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करीत आहे. साहित्य अकादमी, सांस्कृतिक मंत्रालयापासून सर्वसंबंधित विभागांनी त्यासाठी हिरवा कंदिल दाखवला आहे. फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब करणे बाकी आहे. तरी केंद्रसरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राला अमृतकाळातील भेट द्यावी, असेही पवार यांनी या पत्रात म्हटले आहे.