मुंबई दि.१८ :- मुंबई विद्यापीठाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीचा (सिनेट) संपूर्ण कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने गुरुवारी रात्री उशीरा याबाबत परिपत्रक काढून हा निर्णय जाहीर केला.
मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरे गटाची युवा सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पदवीधरांची मोठ्या प्रमाणात मतदार म्हणून नोंदणी करून घेतली होती. नोंदणीकृत पदवीधर गटाच्या खुल्या प्रवर्गातील पाच आणि राखीव प्रवर्गातील पाच अशा एकूण दहा जागांसाठी १० सप्टेंबर रोजी मतदान होणार होते तर १३ सप्टेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार होता.
युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर तो स्गगित करणे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे, असे म्हटले आहे. तर सिनेट निवडणुका रद्द करणे म्हणजे हुकूमशाही प्रवृत्तीच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी केली आहे.