पोलीस निरीक्षक प्रवीण दिनकर यांचा ‘बेस्ट’च्या दोन बसमध्ये चेंगरून मृत्यू
बस चालकाला अटक, गुन्हा दाखल
मुंबई दि.१५ :- मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक प्रवीण दिनकर यांचा सांताक्रूझ पूर्व वाकोला येथे बेस्टच्या दोन बसमध्ये चेंगरून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी सकाळी घडली. ते कर्तव्यावर जात असताना हा अपघात झाला. बेस्टचा बसचालक गौतम लोखंडे याला अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण दिनकर (४५) हे पत्नी आणि दोन मुलीसह सांताक्रूझ पूर्व कालीना येथील अधिकारी वसाहत येथे राहात होते.
शुक्रवारी सकाळी ते कर्तव्यावर जाण्यासाठी मोटारसायकल वरून निघाले. सांताक्रूझ रेल्वे स्थानक येथे मोटारसायकल पार्क करून तेथून ते ट्रेन पकडून मरीन लाईन्स येथे जाणार होते. मोटारसायकलवरून सांताक्रूझ रेल्वे स्थानकाचा दिशेने जात असताना वाकोला मस्जिद बस थांबा येथे त्याच्या मोटारसायकलच्या पुढे असणारी बेस्ट बस थांबली होती, त्या बसच्या मागे प्रवीण दिनकर थांबलेले असताना पाठीमागून सुसाट वेगाने आलेल्या दुसऱ्या बेस्ट बसने दिनकर यांच्या मोटरसायकल जोरदार धडक दिली.
मेट्रो ३ मार्गिकेचे संचालन आणि देखभाल दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन करणार?
या धडकेमुळे दिनकर हे दोन्ही बसच्यामध्ये चेंगरून गंभीररीत्या जखमी झाले, त्यांना तात्काळ बेस्ट बस वाहकाने इतर प्रवाशाच्या मदतीने व्ही,एन, देसाई रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी दाखल करून त्याच्यावर उपचार सुरु केले. उपचार सुरु असताना साडे अकरा वाजता त्यांचा मृत्यू झाला. गौतम लोखंडे हा बेस्ट बसचा कंत्राटी चालक असून त्याच्या म्हणण्यानुसार बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे बसचा अपघात झाला. अपघाताच्या एक दिवसआधी म्हणजेच गुरुवारी प्रवीण दिनकर यांची साप्तहिक सुट्टी असल्यामुळे ते कुटुंबासह अलिबाग येथे सुट्टी घालविण्यासाठी गेले होते.
