पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाला अजित पवार आणि अन्य आमदारांची साथ- चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. २
पंतप्रधान मोदी यांनी जो संकल्प केला आहे त्याला अजित पवार आणि अन्य आमदारांनी साथ दिली, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
आज जे झाले त्याला राजकीय भूकंप म्हणण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार देशासाठी, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आमच्यासोबत आले आणि ते महत्त्वाचे आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारात सहभागी आहे असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच एका जाहीर सभेत केला होता. मला आनंद आहे की आज मंत्रिमंडळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातल्या काही सदस्यांना शपथ दिली.
याचा अर्थ त्यांनी केलेले आरोप सत्य नव्हते. त्यांनी केलेल्या आरोपांमधून सगळ्यांना मुक्त केलले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
आज महाराष्ट्राचा ‘सिंहासन’ चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .उद्धव ठाकरे यांचे ओझे शरद पवारांना उतरवायचे होते, त्याचा पहिला अंक आज पार पडला.
पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच. तसेही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिले जाणारे (अवास्तव) महत्व रुचत नव्हतेच, त्यावर अनायसे उतारा शोधला, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.
या सगळ्याचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही सगळे खंबीरपणे महाराष्ट्रात उभे राहू. एवढेच नव्हे तर या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी उलथापालथी होऊन येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल, असा दावा उबाठा गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण सुरु असून सत्तापिपासू भारतीय जनता पक्षाचे तोडफोडीचे महाभारत केले आहे. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजपाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे चे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनचा पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे. महाराष्ट्राची जनता हा सत्तेचा खेळ उघड्या डोळ्यांनी पहात असून लोकशाही व राज्यघटना धाब्यावर बसवून खुर्चीचा खेळ सुरु असल्याचेही पटोले म्हणाले.
२०१४ पासून देशात लोकशाही व राज्यघटना त्याचबरोबर पक्षांतर बंदी कायद्यावर आघात होतो आहे हे काळजी करायला लावणारे आहे. राज्यात आज घडलेल्या घटनेबाबत जनताच निर्णय करणार असून जनतेचा न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. आजची घडलेली घटना लोकशाही व राज्यघटने करता दुर्दैवी असल्याची खंतही काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
——
