अर्नाळ्यात गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ मठात भक्तिमय वातावरण; स्वानंद सेवा सदनाच्या उपक्रमांतून मानवसेवेचा जागर
अर्नाळा (विरार पश्चिम):
प्रभात कॉलनी, अर्नाळा येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेचा उत्सव अत्यंत भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहात पार पडला. अभिषेक, महापूजा, आरती, नामस्मरण आणि स्वामी नामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
या सोहळ्यात ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. सदानंदबुवा गोखले यांचे विशेष कीर्तन आयोजित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या प्रभावी कीर्तनातून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या विचारांचा, सदाचाराचा आणि मानवतेच्या संदेशाचा पुनरुच्चार केला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात भौतिक प्रगती साधतानाच माणुसकी, करुणा आणि संवेदनशीलता जपणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगत सत्य, सेवा आणि प्राणीमात्रांवरील प्रेमाचा मार्ग दाखवला.

ऐतिहासिक संदर्भ आणि मठाची स्थापना
स्थानिक परंपरेनुसार, सन १८०० च्या सुमारास श्री स्वामी समर्थ महाराजांचे अर्नाळा परिसरात वास्तव्य लाभले होते. याच दैवी प्रेरणेतून २०१५ मध्ये श्री विनायक गुळगुळे व सौ. नूतन गुळगुळे यांनी येथे गजलक्ष्मी स्वरूप कमळासनाधिष्ठित श्री स्वामी समर्थ शक्तीस्थानाची स्थापना केली.
‘स्वानंद सेवा सदन’द्वारे दिव्यांग आणि निराधारांना आधाराचा हात
या शक्तीस्थानाच्या माध्यमातून ‘स्वानंद सेवा सदन’ हा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामीण व आदिवासी भागातील दिव्यांग महिला, मुले आणि युवकांना मोफत निवारा, भोजन, शिक्षण, पुनर्वसन, कौशल्य विकास व स्वावलंबनासाठी मार्गदर्शन दिले जाते. नूतन गुळगुळे फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. नूतन गुळगुळे यांच्या नेतृत्वाखाली सध्या १७ निराधार दिव्यांग भगिनी व मुलांचे विनामूल्य संगोपन व शिक्षण अविरतपणे सुरू आहे.
सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी, तर ठाणे जिल्ह्यात ३ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न
मान्यवरांची उपस्थिती
या गुरुपौर्णिमा सोहळ्यास सुप्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक संजय जाधव, डॉ. चाफेकर, श्री चंद्रकांत भोईर, डॉ. महेश अभ्यंकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. मान्यवरांनी स्वानंद सेवा सदनातील दिव्यांग मुलांशी व महिलांशी संवाद साधून त्यांना प्रोत्साहन दिले आणि संस्थेच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले.
सत्य, करुणा, मानवता आणि निष्काम समाजसेवा यांचा स्वीकार करणे हीच स्वामी महाराजांना दिलेली खरी गुरुदक्षिणा आहे, असा संदेश या सोहळ्याच्या माध्यमातून उपस्थितांना देण्यात आला.

