सामाजिक

कॉर्पोरेट जिहाद’ विरोधात आता संसदेत आवाज उठवणार; भाजप खासदार मेधा कुलकर्णींचे पुण्यात प्रतिपादन

पुणे: “केवळ ‘कॉर्पोरेट जिहाद’च नव्हे, तर भारताचे अस्तित्व पोखरण्याचे षड्यंत्र सर्वच स्तरांवर सुरू आहे. कॉर्पोरेट कंपन्यांमधून हिंदूंच्या प्रथा-परंपरांवर होणारे निर्बंध आणि तरुण पिढीच्या विचारसरणीवरील आक्रमणे रोखण्यासाठी मी हा मुद्दा आगामी संसदेच्या अधिवेशनात मांडणार आहे,” असे स्पष्ट प्रतिपादन भाजपच्या राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुण्यातील मॉडर्न कॉलेज ऑडिटोरियममध्ये आयोजित ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ या अभियानाच्या प्रारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ या विषयांवर जनजागृती करण्यासाठी या विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले होते.

कंपन्यांसाठी कठोर नियमावलीची गरज
खासदार कुलकर्णी पुढे म्हणाल्या की, कॉर्पोरेट आस्थापनांमध्ये वाढता जिहाद रोखण्यासाठी या कंपन्या भारतात येण्यापूर्वीच त्यांच्यावर काही कठोर नियम व अटी लागू करता येतील का, यादृष्टीने विचार सुरू आहे.

प्रत्यक्ष गुन्हेगारांसोबतच त्यांना रसद पुरवणाऱ्या यंत्रणेलाही कायद्याच्या चौकटीत आणून कठोर शासन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

हिंदूंशी होणारा भेदभाव खपवून घेणार नाही: शेफाली वैद्य
प्रसिद्ध लेखिका सौ. शेफाली वैद्य यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील दुजाभावावर कडाडून टीका केली. त्या म्हणाल्या, “काही कंपन्यांमध्ये हिजाब किंवा पगडी चालते, पण कुंकू, टिळा किंवा कलावा लावण्यास विरोध केला जातो.

हा उघडपणे हिंदूंशी होणारा भेदभाव आहे. नाशिकमधील टीसीएस किंवा लेन्सकार्ट सारख्या प्रकरणांतून हे समोर आले आहे. हिंदूंनी स्वतःच्या धार्मिक अस्मितेसाठी संघटित होऊन आवाज उठवला पाहिजे.”

स्वबोध’ आणि ‘शत्रुबोध’ आवश्यक: रमेश शिंदे
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ऐतिहासिक संदर्भासह ‘गजवा-ए-हिंद’ आणि ‘व्हिजन २०४७’ च्या धोक्यांकडे लक्ष वेधले. “लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि आता कॉर्पोरेट जिहादच्या माध्यमातून भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे मनसुबे रचले जात आहेत.

या संकटाचा सामना करण्यासाठी हिंदूंमध्ये स्वतःच्या धर्माचा अभिमान (स्वबोध) आणि शत्रूच्या चालींची ओळख (शत्रुबोध) असणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.