ठळक बातम्या

कल्याण रुग्णालयाची घटना: माध्यमांच्या कटातून जन्माला आलेला भाषिकवाद अर्धसत्य, सत्याचा दुसरा चेहरा?

कल्याण पूर्वेतील एका खासगी रुग्णालयात घडलेल्या हिंसक झटापटीमुळे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण आणि प्रसारमाध्यमांमध्ये खळबळ माजलेली आहे.

सुरुवातीला ही घटना “काही” मराठी मीडिया संस्थांकडून एका परप्रांतीय तरुणाने मराठी परिचारिकेवर हल्ला केल्याच्या रूपात जोमाने दाखवण्यात आली. मात्र, आता कल्याणचे ज्येष्ठ पत्रकार कर्ण हिंदुस्तानी यांनी समोर आणलेली माहिती या संपूर्ण प्रकरणाला एका नवीन आणि गुंतागुंतीच्या वळणावर घेऊन जाते.

काय घडलं होतं?

कल्याण पूर्वेतील एका रुग्णालयात एका तरुणाने एका महिला परिचारिकेसोबत कथितरित्या मारहाण केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या तरुणावर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

या घटनेनंतर राज्यभरात मराठी विरुद्ध परप्रांतीय असा प्रश्न उभा राहिला. काही राजकीय पक्षांनी या घटनेला मराठी अस्मितेशी जोडून जोरदार प्रतिक्रिया दिल्या.

पण आता नवं काय समोर आलंय?

ज्येष्ठ पत्रकार कर्ण हिंदुस्तानी यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट करत दावा केला आहे की, व्हायरल झालेलं सीसीटीव्ही फुटेज केवळ अर्धसत्य दर्शवतं. त्यांच्या मते, पूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर हे स्पष्ट होतं की, संपूर्ण घटनेची सुरुवात संबंधित महिला परिचारिकेने तरुणाच्या बहिणीला थप्पड मारल्याने झाली होती.

त्यांनंतर संबंधित तरुणाने आपल्या बहिणीवर हात उचलणाऱ्या परिचारिकेवर हल्ला केला. हिंदुस्तानी यांचा प्रश्न असा आहे—”एखाद्या भावाने आपली बहिण मार खाणं मुकाट्यानं पाहायचं का, केवळ त्याच्यावर आधीच गुन्हे दाखल असल्यामुळे?”

राजकारण आणि मीडियाच्या भूमिकेवर सवाल

कर्ण हिंदुस्तानी यांचे म्हणणे आहे की, जर तो तरुण मराठी असता, तर ही घटना कदाचित एवढी गाजलीच नसती. “निवडणूकांचा हंगाम सुरू आहे आणि परप्रांतीय तरुणाच्या निमित्ताने काही पक्ष आणि त्यांचे मीडिया सहकारी आपली राजकीय पोळी भाजत आहेत,” असा त्यांचा आरोप आहे.

मनपा आरोग्य विभागाची जबाबदारीही या प्रकरणात तपासली गेली पाहिजे, कारण एखाद्या रुग्णाच्या नातेवाइकाला स्टाफने मारहाण करणे ही एक गंभीर नैतिक व प्रशासकीय चूक आहे.

आता निर्माण झालेले महत्त्वाचे प्रश्न

1. प्रसारमाध्यमांनी सुरुवातीला हेतुपुरस्सर एकतर्फी वार्ता दिली का?

2. रुग्णालय प्रशासनाने असा स्टाफ का ठेवला जो हिंसक वर्तन करतो?

3. निवडणुकीच्या राजकारणात ‘भाषा’ हे एक राजकीय शस्त्र बनवून घटनांची खरी पार्श्वभूमी लपवली जाते का?

4. डॉक्टरांप्रमाणे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार?

 

ही घटना आता केवळ एक मारामारीचा विषय राहिलेली नाही. ती एक सामाजिक, राजकीय आणि प्रसारमाध्यमांशी संबंधित गंभीर चर्चा बनली आहे.

पत्रकार कर्ण हिंदुस्तानी यांचा प्रश्न अत्यंत रास्त आहे—”रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची?” जर खरी परिस्थिती अशी असेल की मारहाणीची सुरुवात स्टाफने केली, तर रुग्णालय प्रशासनालाही उत्तरदायी धरले गेले पाहिजे.

कल्याणमधील या घटनेमुळे हेही सिद्ध झाले आहे की, अर्धवट माहिती, उद्देशपूर्ती प्रसारमाध्यमे, भावनात्मक वातावरण आणि भाषिक अस्मिता एकत्र आल्यावर अगदी सामान्य घटना देखील समाजात विभागणारी ठरू शकते.