कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांचे निवेदन संसदीय समितीला सादर
मुंबई, दि. ५
केंद्र, राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये नव्वद टक्क्यांहून जास्त कामगार अनेक वर्षापासून कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. या कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांचे निवेदन भारतीय मजदूर संघाच्या पुणे जिल्ह्यातर्फे खासदारांच्या समितीचे अध्यक्ष भृतहरी मेहताब यांना सादर करण्यात आले.
केंद्र सरकारच्या संसदीय समितीचा अभ्यास दौरा पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. या अभ्यास दौऱ्यात कामगारांच्या विविध समस्या,कामाची स्थिती, सोयी सुविधा, सामाजिक सुरक्षा याची माहिती घेण्यात आली. या अभ्यास दौऱ्यात हे निवेदन सादर करण्यात आले.
भारतीय मजदूर संघ पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण, सचिव बाळासाहेब भुजबळ, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात आदी यावेळी उपस्थित होते.
कंत्राटी कामगारांना व सर्व क्षेत्रातील कामगारांना समान काम आणि समान वेतन देण्यात यावे, कंत्राटदार मुक्त रोजगार देण्यात यावा, कंत्राटी कामगारांना ग्रॅच्युइटी मिळण्यासाठी सामाजिक निधीची स्थापना करून नोकरीच्या प्रमाणात ती जमा करण्यात यावी, कंत्राटी पद्धत निर्मुलन मंडळ जिल्हास्तरावर स्थापन करण्यात यावे इत्यादी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
——
