धर्म संस्कृती

सर्वांगीण विकासासाठी संस्कृती आणि संस्कारानुसार आचरण आवश्यक – सचिन ठाकुरदेसाई यांचे प्रतिपादन

डोंबिवली, दि. २६
आपल्या जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय संस्कृती, संस्कारानुसार आपण आचरण केले पाहिजे, असे प्रतिपादन पुरोहित मंडळ, डोंबिवली (पूर्व) चे अध्यक्ष सचिन ठाकुरदेसाई यांनी रविवारी येथे केले.

ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण सभा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या ‘नित्य धार्मिक कर्म आणि आपण’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

दिवसभरात आपण काय केले? कसे वागलो? याचे आत्मचिंतनही प्रत्येकाने रात्री झोपताना स्वतःच्या मनाशी केले पाहिजे, असे सांगून ठाकुरदेसाई म्हणाले, भारतीय संस्कृतीचा मूळ पाया माणसाचा सर्वांगीण विकास हाच आहे. आधुनिक काळात तोच आपण दूर केला आहे.

आपण ज्या उपास्य देवतेची उपासना करत असू, जो कोणी गुरू आपण केला असेल त्यांचे लक्ष आपल्याकडे आहे, याची जाणीव सतत ठेवली पाहिजे. म्हणजे आपल्या हातून वाईट कृत्य होणार नाही. काहीतरी मिळवण्यासाठी पोथ्या, पुराणे वाचू नका. तर त्यात सांगितलेला आचार, विचार, जीवनमूल्ये प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणा.

संत साहित्य, वेद, उपनिषदे आपल्या मनावर संस्कार करण्याचे काम करतात.‌पोथ्या, पुराणे आणि हे साहित्य वाचून आपल्या तोंडी ‘भकारा’ची भाषा येत असेल तर त्या वाचनाचा उपयोग काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

प्रातः स्नान, देवपुजा, स्तोत्र पठण, सुर्योपासना व त्याचे महत्त्व, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम यातील आपली कर्तव्ये, मूंज, विवाह या संस्कारांचा झालेला ‘इव्हेंट’ याचाही सविस्तर उहापोह ठाकुरदेसाई यांनी केला.

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण सभेचे कार्याध्यक्ष सुधीर बर्डे, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष मानस पिंगळे यांनी आपल्या संस्थेच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण सभेचे विश्वस्त अध्यक्ष मधुकर ऊर्फ आप्पा कुलकर्णी यांनी ठाकुरदेसाई यांचे स्वागत केले.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *