जम्मूतून हिंदूंना हाकलून देण्यासाठीच कठुआ बलात्कार प्रकरणाचे षड्यंत्र- प्रा. मधु किश्वर
फोंडा, दि. १९
हिंदूंना जम्मूतून हाकलून देण्यासाठीच कठुआ बलात्कार प्रकरणाचे षड्यंत्र रचण्यात आले, असा आरोप ‘द गर्ल फ्रॉम कठुआ’ या पुस्तकाच्या लेखिका आणि ‘मानुषी’च्या संपादिका प्रा. मधु किश्वर यांनी येथे केला.
हिंदू जनजागृती समितीतर्फे श्रीरामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू राष्ट्र संमेलनात प्रा. किश्वर ‘कठुआ येथील सत्य’ या विषयावर बोलत होत्या.
२०१८ मध्ये जम्मूतील रसाना नावाच्या लहानशा गावातील खोट्या बलात्कार प्रकरणाला ‘कठुआ बलात्कार’ प्रकरण म्हणून जगभर प्रसिद्ध करण्यात आले. यात षड्यंत्रपूर्वक हिंदूंना बदनाम करण्याचे आणि काश्मीरनंतर जम्मूच्या क्षेत्रातून बाहेर काढण्याचे एक नियोजनबद्ध षड्यंत्र होते, असे त्या म्हणाल्या.
या प्रकरणात हिंदूंवर सामूहिक बलात्काराचा आरोप लावण्यात आला,मात्र शवविच्छेदन अहवालात बलात्कार झाल्याचा निष्कर्षच मान्य केलेला नाही. या मुलीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्यात आली, असे पोलीस तपासात नमूद करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
शवविच्छेदन अहवालात कुठेही कवटीला मार लागलेला दिसून आला नाही. कोणत्याही अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात पीडितेची ओळख उघड करणे कायद्याने गुन्हा आहे; पण या प्रकरणामध्ये पीडितेचे छायाचित्र आणि नाव माध्यमांमधून जाणीवपूर्वक उघड करण्यात आले.
या प्रकरणात तपासाच्या नावाखाली हिंदू युवकांचा छळ करण्यात आला. परिणामी कठुआतून अनेक हिंदू कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले, असा दावा त्यांनी केला.
अरुणाचल प्रदेशमधील आम्ही हिंदू संघटित असल्याने पुढील पाच वर्षांत अरुणाचल प्रदेशमधील ख्रिस्ती धर्मांतराची समस्या संपवू, असा ठाम विश्वास , अरुणाचल प्रदेश बांबू संसाधन आणि विकास एजन्सी’चे उपाध्यक्ष कुरु ताई यांनी व्यक्त केला.
सध्या अरुणाचल प्रदेशमधील प्रत्येक कुटुंबातील एक तरी सदस्य धर्मांतरित आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही एक उपाय काढला. जी हिंदु व्यक्ती अन्य धर्मांतील व्यक्तीशी विवाह करेल, तिला हिंदू कुटुंबातील संपत्ती मिळणार नाही आणि तिची मुलेही तिला स्वतःलाच सांभाळावी लागतील. यामुळे या समस्येला काही प्रमाणात चाप बसला असल्याचे त्यांनी सांगितले.
या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीच्या HinduJagruti.org या संकेतस्थळावर तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेलवर केले जात आहे.
——
