मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथील १८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू – महाराष्ट्र मंदिर महासंघाची घोषणा
मुंबई, दि. ९
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील १८ मंदिरांमध्ये वस्रसंहइतआ लागू करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली. जळगाव, अकोला, धुळे, नागपूर, नाशिक, अमरावती, अहिल्यानगर (नगर) यांसह कोकण विभागातील मिळून महाराष्ट्रातील एकूण ११४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आल्याचेही घनवट यांनी सांगितले.
महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे मुंबईत शीतलादेवी मंदिरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत घनवट बोलत होते. या वेळी जीवदानी मंदिराचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर, कडाव गणपती मंदिराचे विश्वस्त (कर्जत) विनायक उपाध्ये, केरलीय क्षेत्रपरिपालन समितीचे आचार्य पी.पी. एम्. नायर उपस्थित होते.
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने ७ जून रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांतील मंदिरांच्या विश्वस्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला उपस्थित सर्व मंदिरांच्या विश्वस्तांनी मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा ठराव एकमताने संमत केला, असे घनवट यांनी सांगितले.
हा केवळ प्रारंभ आहे. भविष्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील आणखीही काही मंदिरे वस्त्रसंहिता लागू करणार असल्याचे जीएस्बी टेंम्पल ट्रस्टचे मानद चिटणीस आणि कायम विश्वस्त शशांक गुळगुळे म्हणाले. सनातन संस्थेच्या धनश्री केळशीकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
