गुन्हे-वृत

समीर वानखेडे यांना २३ जूनपर्यंत अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई, दि. ८
केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांना २३ जूनपर्यंत अटक न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यांचा अटकपूर्व जामीन आता २३ जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाप्रकरणी वानखेडे यांना अटकेपासून दिलेला अंतरिम दिलासा रद्द करा, अशी मागणी सीबीआयने उच्च न्यायालयाकडे केली होती.

वानखेडे यांच्याविरोधातील आरोप सकृतदर्शनी खरे असल्याचे आढळून आले आहे. हे आरोप अत्यंत गंभीर आणि संवेदनशील स्वरूपाचे आहेत. सरकारी सेवेतील अधिकाऱ्याने खासगी व्यक्तींच्या साथीने भ्रष्टाचार करणे, फौजदारी कट रचून खंडणीसाठी धमकावल्याचे हे आरोप आहेत.

त्यामुळे वानखेडे यांना अटकेपासून दिलेला अंतरिम दिलासा कायम ठेवण्यात आल्यास प्रकरणाच्या तपासावर त्याचा विपरीत परिणाम होतील, असा दावा सीबीआयने उच्च न्यायालयात बुधवारी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे केला होता.

न्यायालयाने वानखेडे यांना २३ जूनपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले.दरम्यान, याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी समीर वानखेडे यांच्या वकिलांनी न्यायालयात केली आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *