मनोरंजन

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमावली जाहीर

नियम मोडणाऱ्यांना पाच हजार रुपये दंड
मुंबई, दि. ३१
दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसर स्वच्छ, सुंदर ठेवावा यासाठी ‘स्वच्छतेची मार्गदर्शक नियमावली’ जाहीर करण्यात आली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांना पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे, अशी माहिती चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.
नव्या नियमावलीनुसार निर्मिती संस्थांनी चित्रीकरण स्थळांवरील हिरव्या व निळ्या रंगाच्या कचरा कुंडीमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरण करून ठेवावा, वापरलेल्या पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या, इतर प्लास्टिक व पुन्हा वापरण्यायोग्य नसलेले लाकूड, बांबू, तार, लोखंडी साहित्य इत्यादी एकत्रित करून वेगळे ठेवावे, त्याचबरोबर चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर वापरलेली जागा स्वच्छ करून देण्याची जबाबदारी संबंधित निर्मिती संस्थांवर सोपवण्यात आली आहे.
चित्रीकरण संपल्यानंतर त्या ठिकाणचे छायाचित्र जीओ टॅग तंत्राने स्टुडिओ विभागाकडे त्याच दिवशी मोबाइल क्रमांक ७७३८८2६१८६ वर व्हॉटस ॲपद्वारे सादर करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. चित्रनगरी परिसरात उपलब्ध असलेल्या स्वच्छ प्रसाधनगृहाचाच वापर करण्याच्या सूचना कलाकार आणि कामगारांना देण्याचे आवाहनही चित्रनगरी व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. तसेच कचरा विलगीकरणासाठी आवश्यक (हिरवी, पिवळी, निळी) पिशव्या महामंडळामार्फत मोफत उपलब्ध देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *