बांकीपूर पोट निवडणूक निकाल : बिहारच्या राजकारणात नवा विरोधी पक्ष
कट्टर डोबिवलीकर आणि अस्सल बिहारी असा आमचा मित्र राजेश सिन्हा (प्रमुख – mumbaiaaspaas.com Hindi 2 marathi.mumbaiaaspaas.com Marathi 3 english.mumbaiaaspaas.com 4 newslahar.com Bihar ) जो गावी शेती करतो. शहरात पत्रकारिता करतो. बिहारचा सामाजिक, राजकीय अभ्यास आहे. तेथील स्थानिक घडामोडीचे संदर्भ नेमकेपणाने राजेश जोडतो. राजेश सिन्हा बरोबर नियमित बोलणे होत असते.
बांकीपूर पोटनिवडणूक उमेदवार बदलाच्या दिवसापासून ते आजचा निकालाचा दिवस दरम्यान राजेशशी चर्चा झाली. उमेदवार बदलाच्या दिवशी निकाल लागला असे आमचे बोलणे होते. भाजपाचा उमेदवार पराभूत होऊन प्रशांत किशोर जिंकणार असे आम्ही बोललो होतो. भाजपाला राजकीय धक्का असेल पण, बिहारच्या राजकारणात ते भाजपाला सोईचे ठरेल. विरोधी पक्ष राजद आणि मित्र पक्ष जदयु यांना प्रशांत किशोर यांच्या विजयाने एक स्पर्धक बिहारच्या विधानभवनात आला आहे. भाजपाच्या पराभवाच्या दुःखात ते सुख आहे का? हा कळीचा मुद्दा आहे.
बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण बिहारच्या राजकीय समीकरणाची चौकट बदलणार का? सलग तीन दशकांहून अधिक काळ भारतीय जनता पक्षाचा भक्कम बालेकिल्ला राहिलेल्या या शहरी मतदारसंघात जन सुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी मिळवलेला विजय ही बिहारच्या राजकारणातील एका वेगळी सुरुवात ठरेल का?
•प्रशांत किशोर रणनीतीकार ते जिंकणारे
प्रशांत किशोर यांनी यापूर्वी राजकीय पडद्यामागे राहून पक्षांना विजय मिळवून दिला होता. परंतु, बांकीपूरच्या मैदानात स्वतः उतरून त्यांनी १९ हजारहून अधिक मतांच्या फरकाने भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. स्वतःच्या राजकीय प्रवासाचा पहिली पायरी चढले आहेत.
प्रशांत किशोर जिंकले आणि यापेक्षा त्यांनी बिहारच्या द्विकेंद्री भाजप+जेडीयू विरुद्ध राजद या राजकारणात “तिसरा पर्याय” आहे हे दाखवून दिले आहे. त्यांनी निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर केलेले काम आणि सुशिक्षित, तरुण मतदारांशी साधलेला संवाद हा त्यांच्या या पहिल्यावहिल्या विजयाचा मुख्य आधार ठरला असे म्हणता येईल.
•विरोधीपक्ष राजद आणि भाजपा मित्र जेडीयूला धक्का
प्रस्थापित प्रादेशिक पक्ष असलेल्या राजद (राष्ट्रीय जनता दल) आणि जेडीयूसाठी हा निकाल चिंतेचा विषय ठरू शकतो. राजदच्या उमेदवार रेखा कुमारी या पोटनिवडणुकीत चौदा हजार मतांवर अडकून तिसऱ्या क्रमांकावर गेल्या आहेत.
राजेश सिन्हा यांच्या निरीक्षणानुसार, बांकीपूरच्या मतदारांनी विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून मतदारांनी राजदच्या तेजस्वी यादव यांच्याऐवजी प्रशांत किशोर यांच्या जन सुराजवर विश्वास व्यक्त केला आहे. प्रस्थापित पक्षांना जे नको होते—म्हणजेच जातीय चौकटीबाहेर जाऊन विकासावर बोलणारा पर्याय उभा राहणे बांकीपूर निकालाने केले आहे का? याचा आढावा घेणे उपयोगी ठरेल.
•तीन दशकांचा बालेकिल्ला ढासळला
बांकीपूर विधानसभा भाजपचे नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा पारंपरिक जागा होती. ते राज्यसभा खासदार झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. तीन दशके जो मतदारसंघ भाजपकडे राहिला, तो अचानक का गेला? याचे आत्मपरिक्षण आवश्यक आहे.
उमेदवार बदलाचा फटका बसल्याचे जाणवत आहे. त्यातून चुकीचा निर्णय गेला. भाजपने दिलेला नवा चेहरा स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि पारंपरिक मतदारांनी पूर्णपणे स्वीकारला नाही.
पोटनिवडणुकीत झालेले अवघे ३४ टक्के मतदान भाजपला महागात पडले असावे असे दिसते. पक्षाचे हक्काचे केडर-आधारित मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी उतरला नाही असे चित्र दिसत आहे.
•दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाचा बांकीपूरवर प्रभाव
शहरी आणि सुशिक्षित मतदार हा राष्ट्रीय घडामोडींशी नेहमी जोडलेला असतो. दिल्लीत जंतर-मंतरसह अन्य ठिकाणी झालेल्या विविध आंदोलनांमुळे, अस्वस्थतेमुळे मध्यमवर्गीय मतदारांमध्ये एक सुप्त संताप किंवा उदासीनता असावी. बांकीपूर हा शहरी भाग असल्यामुळे दिल्लीतील या राजकीय वातावरणाचा थेट प्रभाव स्थानिक मतदारांवर पडला असावा. यापार्श्वभूमीवर स्थानिक रोजचे प्रश्न आणि उपाय यावर बोलणाऱ्या प्रशांत किशोर यांच्याकडे शहरी मतदार आकृष्ट झाला.
•पराभवाला मास्टर स्ट्रोक म्हणणार की गंभीर दखल घेणार?
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते, तिथे पक्षाचा पराभव होणे मोठा धक्का आणि संघटनात्मक पातळीवरील नामुष्की मानली जाईल. हा निकाल ‘वेक-अप कॉल’ ठरेल का?आहे. सलग तीन दशकांच्या विजयामुळे भाजपच्या स्थानिक संघटनेत आलेली आत्मसंतुष्टता’ (Complacency) असेल का? आत्मविश्वास अति-आत्मविश्वासात रूपांतरित झाला असेल का? स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना ताकद द्यावी लागते हा बोध यातून घेणार का?
•प्रशांत किशोर भाजपला सोयीस्कर की स्वतंत्र ताकद?
प्रशांत किशोर यांच्यावर विरोधकांकडून भाजपची ‘बी-टीम’ असा आरोप केला जातो. प्रशांत किशोर विरोधी मतात विभाजन घडवून आणतात. भाजपाने आपला सुरक्षित मतदार संघ प्रशांत किशोर यांना देऊन त्यांनी केलेल्या मदतीची परतफेड केली असेही बोलले जाईल. बिहार विधानसभा निवडणुकीतील प्रशांत किशोर यांच्या भूमिकेवर भाजपा विरोधकांनी टिका केली होती.
भाजपचा पारंपरिक शहरी मतदार आणि राजदचा असंतुष्ट मतदार या दोघांनाही प्रशांत किशोर यांनी तूर्तास आकर्षित केले आहे. त्यामुळे आता कोणाची ‘बी-टीम’ नाहीतर स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे.
•नवा पर्याय
बांकीपूरचा हा निकाल केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित नसून तो बिहारच्या राजकीय मानसिकतेच्या संक्रमण अवस्थेचे संकेत देणारा असू शकतो.
बिहारचा मतदार जुन्या जातीय समीकरणांना आणि घराणेशाहीच्या राजकारणाने त्रस्त आहे. नव्या चेहऱ्याने काही ठोस, भरीव आणले जनता त्याला स्वीकारेल हे बांकीपूरने दाखवले आहे. भाजपसाठी कोर्स करेक्शनची वेळ आहे, तर प्रशांत किशोर यांच्यासाठी ही त्यांच्या ‘जन सुराज’च्या नव्या आणि प्रदीर्घ राजकीय प्रवासाची सुरुवात आहे.
एक निश्चित प्रस्थापित प्रादेशिक पक्षांना हा निकाल एक इशारा आहे. प्रादेशिक अस्मिता, जात समूहाचे राजकारण आणि भाषिक भावना याला या निकालाने वळसा घातला आहे. विरोधी पक्षांनाही धोक्याची घंटा आहे. पराभवाच्या दुःखात भाजपासाठी हे सुखावह आहे.
अर्थात, राजकीय चाली, डावपेच, शह-मात, कुरघोडी, बचाव यापेक्षा विचार आणि नागरिकांच्या हिताचे धोरण आपला पक्ष विस्तारणे आणि संघटना सशक्त करणे हा निवडणूक जिंकण्याचा प्रभावी मार्ग आहे. बी – टीम च्या राजकारणाचे सुख दीर्घकालीन नसते. सबका साथ, सबका विश्वास आणि सबका विकास याचा मार्ग “शत-प्रतिशत” भाजपातून प्रशस्त होईल, ही खूणगाठ पक्की करणे हा निकालाचा अर्थ आहे.

