Uncategorized

कामगारांकडे दुर्लक्ष केल्यास ‘सरकार जगावो’ आंदोलन; भारतीय मजदूर संघाचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

ठाणे | २५ फेब्रुवारी २०२६ देशाच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या कामगारांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारने सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, आज भारतीय मजदूर संघाच्या (BMS) वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार ‘सरकार जगावो’ धरणे आंदोलन करण्यात आले.

देशातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळावा, या मागणीसाठी पुकारलेल्या या देशव्यापी आंदोलनात ठाणे जिल्ह्यातील हजारो कामगार सहभागी झाले होते.

 

बजेटमध्ये तरतूद नाही, कामगारांचे शोषण सुरूच

आंदोलनादरम्यान कामगार नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. २१ नोव्हेंबर २०२५ पासून सरकारने नवीन कामगार कायदे लागू करण्याची घोषणा केली खरी, मात्र २०२६-२७ च्या ८० लाख कोटींच्या अर्थसंकल्पात त्याच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नाही.

शोषणाचे नवे प्रकार: कंत्राटी, आउटसोर्स, स्कीम वर्कर्स आणि गीग वर्कर्स अशा विविध नावाखाली कामगारांचे आर्थिक शोषण होत आहे.

हक्कांची पायमल्ली: किमान वेतन, सामाजिक सुरक्षा आणि बोनस यांसारख्या कायदेशीर हक्कांपासून कामगारांना वंचित ठेवले जात आहे.

भरती बंद: १९८९ पासून सरकारी भरती बंद असल्याने रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांची नाममात्र वेतनावर बोळवण केली जात आहे.

पेन्शनधारकांची क्रूर थट्टा

औद्योगिक क्षेत्रात आयुष्य वेचणाऱ्या सेवानिवृत्त कामगारांना EPS 95 अंतर्गत केवळ एक हजार रुपये पेन्शन दिली जात आहे, जी आजच्या महागाईच्या काळात त्यांची क्रूर थट्टा आहे.

तसेच, कामगारांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठीचे सर्वोच्च व्यासपीठ ‘इंडियन लेबर कॉन्फरन्स’ गेल्या दहा वर्षांपासून बंद असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

भारतीय मजदूर संघ ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष सचिन कदम आणि जिल्हा सचिव विलास आंबेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांनी हे निवेदन स्वीकारले. या आंदोलनाला केंद्रीय पश्चिम क्षेत्र सह संघटन मंत्री मोहन येणुरे यांची विशेष उपस्थिती लाभली.

आंदोलनातील सहभागी घटक: आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, सुरक्षा रक्षक, बांधकाम मजूर, रिक्षा-टॅक्सी चालक, फेरीवाले, माथाडी कामगार आणि घरकामगार मोठ्या संख्येने या आंदोलनात एकवटले होते.