ब्रिटिश संग्रहालयातून नागपूरकर छत्रपती रघुजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार परत
मुंबई, 11 ऑगस्ट — अठराव्या शतकातील पराक्रमी मराठा सेनानी आणि नागपूर गादीचे संस्थापक छत्रपती श्री रघुजीराजे भोसले यांची ऐतिहासिक ‘फिरंग’ तलवार आता पुन्हा मायमराठीत परत आली आहे. ही तलवार महाराष्ट्र सरकारने ब्रिटिशांकडून यशस्वीरित्या परत मिळवली असून, सोमवारी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लंडनमध्ये जाऊन ती ताब्यात घेतली.
ही तलवार त्या योद्ध्याची आहे, ज्यांच्या पराक्रमाने बंगाल, बिहार, ओडिशा, कडाप्पा, कुर्नूलपर्यंत मराठा साम्राज्याचा दबदबा निर्माण केला. इतिहासकारांच्या मते, नागपूरकर भोसले घराण्याची शस्त्रे ही सौंदर्य, तेजस्विता आणि सामर्थ्य यांचा संगम मानली जातात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि महायुती सरकारच्या प्रयत्नांमुळे ही ऐतिहासिक संपत्ती आपल्या मातीत परत येऊ शकली. १८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात या तलवारीचे भव्य स्वागत सोहळा होणार असून, राज्यभरातून मावळे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज होत आहेत.
छत्रपती रघुजीराजे भोसले यांची तलवार ही केवळ एक शस्त्र नव्हे, तर मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतीक आहे.
जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र!