सामान्य

महाराष्ट्रात व्याघ्र संवर्धनाच्या माध्यमातून पर्यटन, संशोधन आणि रोजगाराला चालना!

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालय, मुंबई येथे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त ‘वाईल्ड ताडोबा’ या माहितीपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक, निर्माता आणि सिनेमेटोग्राफर सुब्बीया नल्लामुथु यांना ‘एशियाटिक बिग कॅट सोसायटी राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सुब्बीया नल्लामुथु यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘वाईल्ड ताडोबा’ या माहितीपटातून त्यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता आणि निसर्गसौंदर्य प्रभावीपणे दाखवले आहे. या प्रकल्पाकडे जागतिक लक्ष वेधण्यासाठी राज्य शासन या माहितीपटाचा प्रभावी वापर करेल.

देशात व्याघ्र संवर्धनात महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काम

गेल्या 10-15 वर्षांमध्ये महाराष्ट्रात वन्यजीव संवर्धनासाठी विशेषतः वाघांच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या इकोसिस्टिमच्या पुनर्स्थापनेसाठी सातत्याने काम करण्यात आले आहे. वन विभागाने राबवलेल्या उपाययोजनांमुळे देशात व्याघ्र संवर्धनाच्या क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक काम केले आहे. या संवर्धन उपक्रमांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून, पर्यटक आणि संशोधक यांची संख्या वाढली आहे. तसेच रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. वन्य प्राण्यांचे संवर्धन हा विषय आता मोजक्या लोकांपुरता मर्यादित न राहता, आता त्याला व्यापक जनसमर्थन मिळत आहे.

संवर्धनातून रोजगार, सहअस्तित्वासाठी पुढाकार

महाराष्ट्राने मानव-वन्यजीव संघर्षासंदर्भात (Man-Animal Conflict) विविध धोरणे तयार केली आहेत. सध्या अशा अनेक नवीन धोरणांची आखणी सुरू आहे, ज्यामुळे जिथे शेती करणे शक्य नाही अशा भागांमध्ये संवर्धनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत, तसेच स्थानिकांना संवर्धन उपक्रमांमध्ये सहभागी करण्यात येत आहे. व्याघ्र संवर्धनासोबत सहअस्तित्व (Coexistence) साधण्यासाठी आवश्यक अशा धोरणांची निर्मिती राज्य शासन करत आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.