भारतीय मज़दूर संघाने जागतिक श्रमिक चळवळीला दिशा द्यावी” – डॉ. मोहनजी भागवत
भारतीय मज़दूर संघाच्या ७० वर्षांच्या गौरवशाली कार्याच्या समारोप सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे मार्गदर्शन
“भारतीय मज़दूर संघाने जागतिक श्रमिक चळवळीला दिशा द्यावी” – डॉ. मोहनजी भागवत
नवी दिल्ली, २३ जुलै २०२५:
भारतीय मज़दूर संघाने (BMS) आपल्या कार्यपद्धती, मूल्ये आणि धोरणांच्या आधारे जागतिक श्रमिक आंदोलनास एक नवा आदर्श दिला असून, आता या संघाने केवळ देशहित नाही तर जागतिक हितासाठी मार्गदर्शक भूमिका घ्यावी, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. श्री मोहनजी भागवत यांनी केले.
BMS च्या स्थापनेची ७० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने इंदिरा गांधी स्टेडियममधील के. डी. जाधव कुस्ती हॉल, नवी दिल्ली येथे भव्य समारोप समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, केंद्रीय मंत्री श्री मनसुख मांडविया आणि माजी सहसरकार्यवाह माननीय श्री भागैयाजी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान BMS चे अखिल भारतीय अध्यक्ष श्री हिरण्मय पंड्या यांनी भूषवले.
या कार्यक्रमात दिल्लीच्या मुख्यमंत्री श्रीमती रेखा गुप्ता, कामगार मंत्री श्री कपिल मिश्रा, विधानसभा अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री श्री संतोषजी, RSS चे पदाधिकारी, ILO (जगातील श्रमिक संघटना) च्या जपानी डायरेक्टर मिस मिशिको मियामोतो, हिंद मजदूर सभा, AITUC, INTUC, AICCTU या प्रमुख केंद्रीय संघटनांचे प्रतिनिधी, नेपाळमधील मजूर संघटनांचे पदाधिकारी, FICCI आणि CII या औद्योगिक संघटनांचे सदस्य तसेच देशभरातील BMS चे अध्यक्ष, महामंत्री, विविध राज्यांतील कार्यकर्ते आणि सुमारे ८,००० मजूर प्रतिनिधी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरूवात BMS, दिल्ली प्रांतच्या अध्यक्षा श्रीमती इंदु जम्वाल यांच्या स्वागत भाषणाने झाली. त्यांनी नमूद केले की, १९६७ मध्ये दिल्लीमध्ये BMS चे पहिले अधिवेशन झाले होते, आणि आज ७०व्या वर्षगाठचा समारंभ पुनश्च दिल्लीमध्येच होत आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.
BMS चे अखिल भारतीय महामंत्री श्री रविंद्र हिमते यांनी वर्षभरातील कार्यक्रमांची माहिती देताना सांगितले की, संघटनेने सात दशके मजूर हक्कांसाठी संघर्ष करत स्पष्ट वैचारिक दिशा राखली आहे. हा समारोप म्हणजे यशस्वी कालखंडाचा शेवट नाही, तर पुढील टप्प्याची सुरुवात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
BMS अध्यक्ष श्री हिरण्मय पंड्या यांनी सांगितले की, १९८९ पूर्वी BMS भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रमिक संघटन होते, मात्र त्यानंतर ते देशातील क्रमांक एकचे संघटन झाले. आज BMS केवळ भारतापुरतीच मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय पातळीवरही कार्यरत आहे. G-20 च्या अंतर्गत L-20 मध्ये BMS ने भारताचे श्रमिक विचार जागतिक स्तरावर पोहोचवले आहेत. सध्या BMS २८ राज्यांमध्ये, ४४ महासंघांमधून आणि ६,६३० कार्यरत संघटनांमधून सक्रिय आहे असून नेपाळमध्येही BMS चे कार्य सुरू झाले आहे.
माजी सहसरकार्यवाह श्री भागैयाजी यांनी आपल्या भाषणात हा कार्यक्रम केवळ आनंदाचा किंवा साजरा करण्याचा क्षण नसून, हा विचारप्रवाह आणि चळवळीचा भाग आहे, असे सांगितले.
केंद्रीय मंत्री श्री मनसुख मांडविया यांनी प्रसंगी सांगितले की, BMS ची कार्यपद्धती प्रेरणादायी आहे. ७० वर्षांच्या प्रवासात हे संघटन भारताचेच नव्हे, तर जागतिक पातळीवरील महत्त्वाचे श्रमिक संघटन बनले आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातून अण्णा धुमाळ, अनिल ढुमणे, किरण मिलगीर, सी. व्ही. राजेश, मोहन येनुरे, रामनाथ किणी, शर्मिला पाटील, तृप्ती आलती, रवींद्र देशपांडे, संतोष गदादे, विराज टिकेकर, सचिन मेंगाळे, सुरेश पाटील, मंगेश देशपांडे, जयंतराव देशपांडे यांच्यासह विविध उद्योगांतील ५० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात ‘ई-कार्यकर्ता’ पोर्टलचे लोकार्पण करण्यात आले, BMS च्या कार्यावर आधारित लघुपट प्रदर्शित करण्यात आला, तसेच ‘ऑर्गनायझर’ मासिकाच्या विशेष अंकाचे विमोचन डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला आणि BMS, दिल्ली प्रदेशचे महामंत्री डॉ. दीपेंद्र चहार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
(संपादकीय टिप्पणी: भारतीय मज़दूर संघ हा एक कामगारांच्या हितासाठी झटणारा स्वयंसेवी संघ असून, त्याची सात दशकांची वाटचाल भारतीय कामगार क्षेत्राच्या इतिहासात एक महत्वपूर्ण पर्व आहे.)