काँग्रेसनेते शिवकुमार प्रकरण: कुठल्या बिळात लपलात ? कोणता बोळा तोंडात कोंबून घेतलात ?
काँग्रेसचे नेते शिवकुमार जे महाकुंभात जाऊन पवित्र स्नान करून आले ते शिवकुमार जग्गी वासुदेव म्हणजे सद्गुरु आयोजित ईशा फाउंडेशनच्या वार्षिक महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
शिवकुमार हे निमंत्रणावरून कोईम्बतूर येथे गेले होते. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. सद्गुरु यांनी यावेळी आपल्या बोलण्यात गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्याचा गौरव केला.
काँग्रेसने शिवकुमार यांच्या उपस्थितीविषयी तीव्र आक्षेप घेतला आहे. रा. स्व. संघाचे समर्थक असलेल्या, राहूल गांधी यांच्यावर टिका करणाऱ्या सद्गुरु यांच्या कार्यक्रमात गेल्या बद्दल काँग्रेसने जाब विचारला आहे.
काँग्रेसने शिवकुमार यांचा धिक्कार करणे स्वाभाविक आहे. काँग्रेसने टिका करणे संयुक्तिक आहे. काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि शिवकुमार असा पक्षांतर्गत संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यातून काँग्रेसने संधी साधून शिवकुमार यांची कृती चुकीची ठरवली आहे.
शिवकुमार यांना काँग्रेस आरोपी ठरवत असताना मात्र, त्यांचा बचाव करण्यासाठी डॉ. तारा भवाळकर, अमोल पालेकर, जावेद अख्तर, नसिरुद्दीन शाह टाईपचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे स्वयंघोषित संरक्षक पुढे आलेले नाहीत.
हे बिळात जाऊन लपलेत. यांनी स्वहस्ते तोंडात बोळा कोंबून घेतला आहे. पक्षांतर्गत कुरघोडी वेगळा मुद्दा असून, एक व्यक्ती म्हणून शिवकुमार यांच्या कार्यक्रमाला जाण्याची निंदा म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच आहे असे म्हणण्याची हिम्मत या कथित पुरोगाम्यांनी दाखवली नाही.
काँग्रेसला प्रश्न विचारण्याचे धाडस सेक्युलर टोळक्यात नाही. राजकारणाची सरमिसळ करू नका असा सल्ला हा चमू काँग्रेसला देत नाही. राजकारणापलीकडचा कार्यक्रम म्हणून बघा असे शहाणपण शिकवत नाही. या कंपूचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धोका सिलेक्टिव्ह आहे.
अश्या वागण्यातून हे पुरोगामी स्वतःला उघडे पाडून घेतात. या अश्या घटनातून त्यांची पोलखोल होते. अश्या पोलखोलीवर बोट देऊन यांची ही वैचारिक चोरी पकडून देणे गरजेचे आहे.