ठळक बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेट

ठाणे दि.०६ :- ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी गुरुवारी मध्यरात्री शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी केली. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करून सद्य:स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालयांना तत्काळ भेट द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जिल्हाधिकारी शिनगारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे यांच्यासोबत शहापूर तालुक्यातील डोळखांब प्राथमिक आरोग्य केंद्रास मध्यरात्री साडेबारा वाजता अचानक भेट दिली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. पटेल यांच्यासह परिचारिका व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या आरोग्य केंद्रात रात्री दहा वाजता एका महिलेची प्रसूती झाली होती. आरोग्य केंद्रातील प्रसूती कक्ष, वैद्यकीय अधिकारी यांचे कक्ष, औषध भांडार, रुग्ण कक्ष यांचीही पाहणी केली. रात्री दीड वाजता जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी टाकी पठार या अतिदुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. या केंद्रातील शस्त्रक्रिया विभाग, रुग्ण कक्ष, येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची सोय आहे का?, पुरेशी औषधे आहेत का? याची चौकशी करून खातरजमाही केली.

विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त आजी – माजी सदस्यांचा स्नेहमेळावा

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांनी रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा असल्याची माहिती दिली. आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही नागरिकांना परत पाठवू नये, त्यांना आवश्यक असणारे उपचार व औषधे तातडीने उपलब्ध करून देण्याची दक्षता आरोग्य अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल यांनी केल्या. तसेच आरोग्य केंद्रात पुरेसा पाणी व वीज पुरवठा करण्याची सूचनाही त्यांनी केली. राज्य सरकारचे आरोग्य व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य आहे. दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः जातीने लक्ष देत आहेत.

शासकीय रुग्णालयात दगावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत द्यावी

त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी सतर्क राहून रुग्णांची सेवा करावी, प्रत्येक आरोग्य केंद्रातील औषध साठा पुरेसा आहे, याची खात्री करावी, औषध साठा संपण्यापूर्वी पुरेशा वेळेत त्याचा अंदाज घेऊन आवश्यक औषध साठा वेळेत उपलब्ध होईल, याची खात्री बाळगावी, औषध साठ्याची माहिती ई-सुश्रुत किंवा ई-औषधी या पोर्टलवर वेळोवेळी अपलोड करावी, आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचीही आस्थेने चौकशी करून दाखल रुग्णावर तातडीने आवश्यक व योग्य औषधोपचार करावेत, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी त्याचबरोबर रुग्णालय व रुग्णालयाचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवावा, असेही जिल्हाधिकारी शिनगारे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *