मुंबईतील गणपती विसर्जन सोहळा तब्बल २८ तास
गिरगाव चौपाटीवर सकाळी अकरापर्यंत गणेश विसर्जन
मुंबई, दि. २९
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गुरुवारी सकाळी सुरू झालेला विसर्जन सोहळा तब्बल २८ तासांहून अधिक काळ सुरू होता. गिरगाव चौपाटीवर शुक्रवारी सकाळी अकरावाजेपर्यंत गणेश विसर्जन सुरू होते.
गुरुवारी सकाळी लालबागमधील गणेशगल्लीतील ‘मुंबईच्या राजा’ची विसर्जन मिरवणूक सुरू झाली. त्यापाठोपाठ लालबाग परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती मार्गस्थ होऊ लागल्या. ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेण्यासाठी लालबाग परिसरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
कुलाबा, गिरगाव, ग्रॅन्ट रोड, मुंबई सेंट्र, परळसह उपनगरांमध्येही गणेश विसर्जन मिरवणुका मार्गस्थ होऊ लागल्या आणि विसर्जनस्थळी जाणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले. परिणामी, या मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. सर्व ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गिरगाव, दादर, जुहू यासह सर्व चौपाट्या, तलाव, कृत्रिम तलावांवर दुपारनंतर गणेश विसर्जनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. गिरगाव चौपाटीवर शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास ‘लालबागच्या राजा’ आणि गिरगाव, डोंगरी, उमरखाडी आणि आसपासच्या परिसरातील मानाच्या गणपतींचे विसर्जन झाले. त्यानंतर बृहन्मुंबई महापालिका आणि सामाजिक संस्थांनी विसर्जनस्थळी स्वच्छता मोहीमेस सुरुवात केली.