पनवेल ते कळंबोली रेल्वे मार्गावर मालगाडीचे डबे घसरले; कोकणात जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत
– प्रवाशांचे रविवारी सकाळी रेल्वे रोको आंदोलन,
– उपनगरी गाड्यांची वाहतूक ठप्प
– लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
मुंबई, दि. १
पनवेल ते कळंबोली रेल्वे मार्गावर शनिवारी मालगाडीचे डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातामुळे कोकणात जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे कोकणातील प्रवाशांनी दिवा स्थानकात आज ( रविवारी) रेल्वे रोको आंदोलन केले. त्यामुळे उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतूक ठप्प झाली तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडले.
मालगाडीचे घसरलेले डबे बाजुला करुन पनवेल-कळंबोली रेल्वे मार्ग सुरळीत करण्याचे काम वेगाने सुरू आहे, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.
सकाळी नऊ वाजता सुरू झालेला रेल्वेरोको सुमारे एक तास सुरू होता. त्यांनतर वाहतूक सुरळीत झाली. परंतु रेल्वे गाड्यांच्या एकामागे एक रांगा लागल्याने रेल्वे वेळापत्रक पार कोलमडून गेले.
रेल्वे वेळापत्रक कोलमडण्याचा सर्वाधिक फटका कोकणात जाणाऱ्या, येणाऱ्या प्रवाशांना बसला. तुतारी एक्सप्रेसमध्ये शनिवारी रात्री बारा वाजता बसलेले प्रवासी सकाळपर्यंत तळोजा रेल्वे स्थानकाजवळ खोळंबून होते. तळोजा परिसरात काही लांब पल्ल्यांच्या गाड्या रेल्वे मार्गावर एकामागोमाग उभ्या आहेत.
गाडीत खोळंबलेल्या अनेक प्रवाशांनी खाली उतरून रेल्वेमार्गातून चालत जवळचे रेल्वे स्थानक गाठले. पनवेल, तळोजा, कळंबोली, पेण रेल्वेस्थानक मार्गात हेच चित्र होते.
निझामुद्दिन-एर्नाकुलम एक्सप्रेस टिटवाळा रेल्वे स्थानकात, एर्नाकुलम-ओखा एक्सप्रेस पेण रेल्वे स्थानकात थांबून ठेवण्यात आली आहे. सावंतवाडी-सीएसएमटी एक्सप्रेस पनवेल स्थानकात रद्द करण्यात आली आहे.
——-