मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे राज्यभरात पडसाद
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला. जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण
सरसकट ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली अंबड व गेवराई तालुक्यातील १२३ गावांनी मंगळवारी आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी राज्य सरकारने ठोस आश्वासन दिले नव्हते. त्या कारणास्तव जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले होते. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी शेकडो समर्थकांनी गर्दी केली. वाढलेली, गर्दी पाहून तसेच आंदोलकांच्या तब्येतीची स्थिती लक्षात घेता त्यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलिसांनी केली मात्र, आंदोलकांनी नकार दिल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. लाठीमारात अनेक आंदोलक जबर जखमी झाले.