आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
पालघर दि.०९ :- जल, जंगल, जमिनीचे रक्षण करत पर्यावरण जपणाऱ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील राजीव गांधी मैदान येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागामार्फत राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते दूरदृष्य प्रणाली मार्फत बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. आदिवासी आश्रम शाळांचा कायापालट करण्यात आला आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी पूर्व परिक्षा केंद्र सुरू करण्यात आले असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. आदिवासींची प्राकृतिक परंपरा जपणारी जीवनशैली आहे. देशाचा गौरव जपण्यात आदिवासींचे काम अविस्मरणीय आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तर आदिवासी बांधवांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी आवश्यक असलेला निधी तातडीने वितरीत केला जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम तथा पालघर जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आदिवासी विकास मंत्री डाॅ विजयकुमार गावित, खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांचीही भाषणे यावेळी झाली. विविध शासकीय योजनांचा मान्यवरांच्या हस्ते लाभ वाटप कार्यक्रम व विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या आदिवासी बांधवांचा गुण गौरव करण्यात आला. यावेळी चाळीस प्रकारचे पारिपारिक नृत्य प्रकार सादर करण्यात आले. आदिवासी विकास आयुक्त नैना गुंडे यांनी प्रास्ताविक केले तर प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी आभार मानले.