मुंबईसह उपनगरात आणि ठाणे परिसरात आजही मुसळधार
सखल भागात पाणी साचले, रस्ते वाहतुकीला फटका
मुंबई दि.२१ :- मुंबई शहर, उपनगरांत आणि ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरात आज शुक्रवारीही मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे सखल भागातं पाणी साचले असून, त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसला. दरम्यान हवामान विभागाने मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
किंग्ज सर्कल, सायन सर्कल, चुनाभट्टी, मालाड, घाटकोपर येथे पाणी साचले. हार्बर मार्गावरील लोकल सेवा अंशतः बंद झाली आहे. हार्बर रेल्वेच्या कुर्ला स्थानकात पाणी साचल्यामुळे वडाळा ते मानखुर्द लोकल सेवा बंद झाली आहे. मानखुर्द ते पनवेल सेवा सुरू आहे. मध्य व पश्चिम रेल्वेची लोकल सेवा सध्या सुरळीत सुरू आहे. यात मध्य रेल्वेची वाहतूक काही मिनिटे उशीराने सुरू आहे.
मरिन ड्राईव्ह, वांद्रे, मुंलुंड, भांडुप, अंधेरी या भागांतही पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. या ठिकाणी दोन ते तीन फुट पाणी साचले आहे. त्यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पश्चिम द्रूतगती महामार्गावरील वाहतूकही मंदावली आहे. बोरीवलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.
