मुख्यमंत्र्यांनी स्वत:बचाव कार्याचे नेतृत्व केले! – उद्धस्त झालेल्या वस्तीवर पोहोचले
मुंबई, दि. २०
विधानभवनातले कामकाज संपवून बुधवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इरशाळवाडीवर पोहोचले आणि बचाव कार्याचे नेतृत्व केले.
गडाच्या पायथ्याशी येऊन मुख्यमंत्री थांबले नाही तर वरती चढून प्रत्यक्ष उद्धस्त झालेल्या वस्तीवर येऊन त्यांनी संपूर्ण बचाव कार्याचे नियंत्रण केले. भर पावसात विश्रांती न घेता, रेनकोट घालून स्वत: बचाव कार्यात उतरलेले मुख्यमंत्री पाहून बरोबरचे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा अवाक झाले.
विशेष म्हणजे आज विधिमंडळ अधिवेशनाचा चौथा दिवस. मात्र या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांवर कामकाजाची जबाबदारी टाकली आणि स्वत: बचाव कार्यात झोकून दिले.
एरवी पांढरा शुभ्र शर्ट आणि पॅण्ट परिधान केलेले मुख्यमंत्री आज एका सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेत दिसले. मुख्यमंत्र्यांनी भर पावसात इरशाळवाडीकडे चढाईला सुरूवात केली. चिखलाने निसरडा झालेला रस्ता पायी तुडवत ते वस्तीवर पोहचले.
मुख्यमंत्री शिंदे गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास वर्षा निवासस्थानाहून घटनास्थळाकडे निघाले. ते साडेसातच्या सुमारास तेथे पोहोचले.
इरशाळगडाच्या पायथ्याला असलेल्या गावाला बेस कॅम्प करून मुख्यमंत्री केवळ निर्देश, सुचना देऊन तेथून निघाले नाहीत तर परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील कामगारांना त्यांनी मदतीचे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
दुपारी एकच्या सुमारास भर पावसात मुख्यमंत्री पायी चालत निघाले. पायथा ते दुर्घटनास्थळ हे सुमारे दीडतासाचे अंतर त्यांनी चालत जाऊन गाठायचे ठरवले. प्रतिकुल हवामान, अवघड चढण यावर मात करीत मुख्यमंत्री शिंदे ग्रामस्थांशी चर्चा करीत मजल दरमजल करीत चढण चढत होते.
केंद्रीय गृहमंत्री, वायुसेनेचे अधिकारी, परिसारीतल सामाजिक आणि दुर्गप्रेमी संस्था, गिर्यारोहक संस्था यांच्याशी ते सतत बोलत होते आणि त्यांच्याकडून बचावासाठी आणखी काय काय करता येईल ते पहात होते. मदत कार्याला वेग येण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
——
