राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती -प्रफुल्ल पटेल यांची घोषणा
मुंबई, दि. ३
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती केल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज केली.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे यावेळी उपस्थित होते.
विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडावे आणि प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे तटकरे यांच्याकडे सोपवावित आणि तटकरे यांनी कामाला लागावे, असेही पटेल म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पक्षाच्या विधिमंडळ गट नेतेपदी तर अनिल पाटील यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे, असेही पटेल यांनी सांगितले.
तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीसाठी आपण प्रयत्न करत राहू. पक्ष आणि चिन्ह आमच्याबरोबर आहे. एकाच नेत्याला विरोधी पक्षनेता आणि प्रतोद नेमता येत नाही, असे अजित पवार म्हणाले.
जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र ठरविण्यात यावे, यासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आले आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.
—
