आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच सरकारमध्ये सामील झालो- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. २
आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच सरकारमध्ये सामील झालो असून आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्याच नावाने आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावरच लढविणार आहोत, असे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.
राजभवनवर अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यावेळी उपस्थित होते.
राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी आम्ही शिवसेना आणि भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. भाजपसोबत जाण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर आज त्याला मूर्त स्वरुप आले, असेही अजित पवार म्हणाले.
शिवसेनेला जातीयवादी म्हणून संबोधले जात होते. त्यांच्यासोबत काँग्रेस आणि आम्ही गेलो. ज्या पक्षाला जातीयवादी म्हटले जाते त्यांच्यासोबत आम्ही जाऊ शकतो तर मग भाजपसोबत जाण्यात काय अडचण आहे?
आम्ही नागालँडमध्ये भाजपसोबत गेलो मग महाराष्ट्रात विकासाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपसोबत का जाऊ शकत नाही? असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण सुरु असून सत्तापिपासू भारतीय जनता पक्षाचे तोडफोडीचे महाभारत केले आहे. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजपाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे चे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनचा पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे. महाराष्ट्राची जनता हा सत्तेचा खेळ उघड्या डोळ्यांनी पहात असून लोकशाही व राज्यघटना धाब्यावर बसवून खुर्चीचा खेळ सुरु असल्याचेही पटोले म्हणाले.
——
