वंदे भारत एक्सप्रेसमुळे कोकणातील पर्यटनाला मिळेल चालना- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे
मडगाव – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत
मुंबई, दि. २८
मडगाव (गोवा) – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमुळे विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पोफळीच्या बागा आणि डोंगर – दऱ्यांनी नटलेल्या कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल येथे व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सकाळी मडगाव ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या वंदेभारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर सायंकाळी वंदेभारत एक्स्प्रेसचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आगमन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी वंदे भारत एक्स्प्रेसचे लोको पायलट व प्रवाशांशी संवाद साधत त्यांचे मिठाई आणि गुलाबपुष्प देवून स्वागत केले.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार यामिनी जाधव, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक नरेश लालवाणी, मुंबई विभागाचे महाप्रबंधक रजनीश गोयल आदी उपस्थित होते.
वंदे भारत एक्सप्रेसमुळे कोकणातील पर्यटनाला मिळेल चालना- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि पर्यटनात अग्रेसर असलेल्या गोवा दरम्यान सुरू झालेल्या रेल्वेमुळे पर्यटनाचा शाश्वत विकास होण्यास आणखी मदत होईल. वंदे भारत एक्स्प्रेस देशात निर्मित असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यास मदत करणारी आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
———–
