महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाकडून देवेंद्र फडणवीस, मंगलप्रभात लोढांचा सत्कार
मुंबई, दि. २७
महाराष्ट्र शासनाने नुकतीच अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली. त्यानिमित्त भारतीय मजदूर संघप्रणित महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला आणि बाल कल्याणमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा सत्कार करण्यात आला.
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, ही मागणी गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित होती. महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने मानधनात वाढ करून अंगणवाडी सेविकांना दिलासा दिला.त्यानिमित्त मुंबईत मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात फडणवीस, लोढा यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान महाराष्ट्रातील वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्या, महत्वपूर्ण समस्या याबाबत सविस्तर निवेदन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांतर्फे (संलग्न भारतीय मजदूर संघ) उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
उर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांचीही भेट घेऊन वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना भेडसावत असलेल्या समस्यांविषयी चर्चा करण्यात आली.
अंगणवाडी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सुरेखा गायकवाड आणि पदाधिकारी तसेच महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे (संलग्न भारतीय मजदूर संघ)प्रदेश अध्यक्ष निलेश खरात, महामंत्री सचिन मेंगाळे व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते .
—–
