पंतप्रधान फंडाचीही चौकशी करा- उद्धव ठाकरे
मुंबई, दि. २४
आम्ही चौकशीला घाबरत नाही. चौकशी करायचीच असेल तर पिंपरी – चिंचवड, पुणे, नागपूर महापालिकांची तसेच पीएम केअर फंडचीही चौकशी करा. जशी आमची चौकशी करता आहात तशी तुमचीही चौकशी करायला हवी, असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.
दादर येथे शिवाजी मंदिर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या नगरसेवक, शाखाप्रमुख मेळाव्यात ते बोलत होते.
करोना काळात महाराष्ट्रात पंधरा दिवसांत रुग्णालये सुरु केली, तर केंद्र सरकारने नुसत्या थाळ्या आणि टाळ्या वाजवायला सांगितले, असेही ठाकरे म्हणाले.
पाटणा येथे झालेल्या मेळाव्यात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले, त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ठाकरे यांनी, फडणवीस यांनी इतक्या खालच्या पातळीवर येऊ नये. फडणवीसांनाही कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबातील व्हॉट्सअॅप चॅट बाहेर येत आहेत.
आम्ही अद्याप त्यावर बोललो नाही. जर फडणवीसांच्या कुटुंबावर बोलावे लागले, तर त्यांना केवळ शवासन करावं लागेल, असे ठाकरे यांनी सांगितले.
पाटणा येथे झालेल्या मेळाव्यात मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला बसलो म्हणून तुम्ही माझ्यावर टीका करताय.
मी मुद्दाम त्यांच्या शेजारी बसलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह तुमचे नेते आहेत की नाही? नवाज शरीफांबरोबर फोटो आहेत. मी माझ्याकडे तुमचा अल्बमच करून ठेवला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
—–
