मुंबई ठाणे परिसरासह महाराष्ट्र गारठला
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.२१ :- मुंबई ठाणे परिसरासह संपूर्ण महाराष्ट्र गारठला असून पुढील काही दिवस गारव्याचे असतील. उत्तरेकडील राज्यांत तापमानाचा पारा घसरल्याने तेथून येणारे वारे आणि कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असल्याचे वेधशाळेकडू सांगण्यात आले.
यंदाच्या हंगामात प्रथमच रात्रीच्या किमान तापमानाचा पारा १० अंशांखाली गेला असून, रविवारी जळगाव येथे राज्यातील नीचांकी ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईत किमान तापमान २० अंशाच्या खाली तर राज्यातही अनेक शहरांचे तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात शुक्रवारी आणि शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात गारठा जाणवला.
जम्मू-काश्मीर, लडाख आदी भागांत काही ठिकाणी बर्फवृष्टी होत आहे. त्या भागातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आणि कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे उत्तर आणि उत्तर-पश्चिम भागातील तापमानाचा पारा घसरला. पुणे, नाशिक, औरंगाबादचेही किमान तापमान १० अंशांखाली नोंदविले गेले. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. मुंबई परिसरासह कोकण विभागातही सरासरीच्या तुलनेत तापमान कमी झाले आहे.