लोकमान्य टिळकांची चरित्रगाथा झी मराठीवर
येत्या २१ डिसेंबरपासून ‘लोकमान्य’ मालिका
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.२१ :- ‘भारतीय असंतोषाचे जनक’ आणि स्वातंत्र्यलढ्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची चरित्रगाथा झी मराठी वाहिनीवर उलगडली जाणार आहे. येत्या २१ डिसेंबरपासून झी मराठीवर ‘लोकमान्य’ ही नवी मालिका सादर होणार आहे.
लोकमान्य टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाच्या घटना, प्रसंग मालिकेत पाहायला मिळणार आहेत. टिळकांचा विवाह, त्यांचे महाविद्यालयीन जीवन, त्यांचे विविधांगी लेखन, राजकीय स्तरावरील त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वपूर्ण टप्पे मालिकेतून उलगडले जाणार आहेत.
अभिनेता क्षितीज दाते (धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका केलेले) अभिनेत्री/सूत्रसंचालक स्पृहा जोशी मालिकेत प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. मालिकेचे लेखन आशुतोष परांडकर यांनी केले असून दिग्दर्शन स्वप्निल वारके यांचे आहे. ही मालिका बुधवार ते शनिवार या दिवशी रात्री साडेनऊ वाजता प्रसारित होणार आहे.