उबाठा गटाला आणखी एक धक्का विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे शिवसेनेत दाखल
मुंबई, दि. ७
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आज आणखी एक धक्का बसला. विधानपरिषदेच्या उपसभापती आणि उबाठा गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उबाठा गटाला रामराम करून शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून नीलम गोऱ्हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना योग्य मार्गाने जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतल्याचे गो-हे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाच अधिकृत आहे, असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगानेही दिला आहे, असेही त्या म्हणाल्या.
१९९८ साली मी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत चांगले काम करता आले. केंद्र सरकारने अनेक सकारात्मक पावले उचलली आहेत. नरेंद्र मोदी व अमित शाह यांची अनेक मुद्द्यांवर चांगली इच्छाशक्ती दिसते आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकांचा सन्मान करून केंद्रातील व राज्यातील सरकार काम करत आहे, असेही गो-हे यांनी सांगितले.
—–