ठळक बातम्या

ठाण्यात राज्यातील पहिले अवयवदान जनजागृती उद्यान अवयव दान ही काळाची गरज- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि.०३ :- अवयव दान ही काळाची गरज असून याविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण झाली तर अनेक जीव वाचविण्यास मदत होणार आहे. अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी राज्यातील पहिले ‘अवयवदान जनजागृती उद्यानʼ ठाण्यात उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच भविष्यात अशा स्वरूपाचे उद्यान राज्यातील इतर शहरात महापालिका आणि नगरपरिषदेतर्फे सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हे उद्यान कम्युनिटी पार्क, पोखरण रोड नं २, येथील सहा हजार चौरस मीटर जागेवर उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी अवयवदान संदर्भातील माहिती पुस्तिका उपलब्‍ध करून देण्यात येणार असून प्रस्तावित उद्यानात मूत्रपिंड (किडनी), यकृत ( लिव्हर), हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड, छोटे आतडे, डोळे, त्वचा, हाडे, हात या अवयवाच्या आणि पेशींच्या प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत. तसेच या अवयवांसंदर्भातील माहिती त्याठिकणी मोठ्या फलकावर लावण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

अवयवदानासंदर्भातील शास्त्रीय स्वरूपाची माहिती या ठिकाणी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या उद्यानात अवयव दान करण्याचा प्रतिज्ञा अर्ज नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. ज्या नागरिकांना हा अर्ज भरायचा आहे त्यांच्याकडून तेथेच भरून घेण्यात येऊन तो अर्ज नोंदणीकरिता राज्य अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्थेच्या कार्यालयात सुपूर्द करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.‌

एक मेंदूमृत व्यक्ती अवयवदान करून ८ व्यक्तींना जीवनदान देऊ शकते. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच वैद्यकीय विश्वातील प्रगतीमुळे अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. त्यामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण पुढे येत आहे. मात्र मेंदूमृत व्यक्तीकडून अवयवदान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. ती दूर करण्यासाठी मेंदूमृत अवयवदान मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे.

सध्या राज्यात अवयव प्रत्यारोपणासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्ण प्रतिक्षेत आहेत. ही संस्था पुढीलप्रमाणे मुत्रपिंड प्रत्यारोपण – ५,८३२, यकृत प्रत्यारोपण- १,२८४, हृदय प्रत्यारोपण– १०८, फुफ्फुस प्रत्यारोपण – ४८, स्वादुपिंड प्रत्यारोपण – ३५, छोटे आतडे प्रत्यारोपण – ३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *