आगीचे संकट, चिमुकलीची सतर्कता आणि अग्निशमन दलाचे यशस्वी बचावकार्य
मुंबई दि.१३ :- रविवारी दुपारची साडेचारची वेळ चोवीस मजली इमारतीतील तेवीसांव्या मजल्यावरील सदनिकेला अचानक आग लागते. काही क्षणात ती आग रौद्ररूप धारण करते. या इमारतीत राहणारी अवघी ७ वर्षाची पहिलीत शिकणारी चिमुरडी प्रसंगावधान राखत आईला धोक्याची सूचना देते. चिमुरडीची आईही समयसुचकता बाळगत आपत्कालीन यंत्रणेला वर्दी देते क्षणाचाही विलंब न करता घाबरून न जाता रहिवाशांना इमारत रिकामी करण्याची सूचना करते . महानगरपालिकेचे अग्निशमनदल अर्ध्या तासात आग आटोक्यात आणते. चिमुरडी आणि तीच्या आईच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळतो … ! ही घटना घडली मालाड (पश्चिम) येथील छत्रपती शिवाजी राजे संकुलातील पंचरत्न अपार्टमेंटमध्ये. या सातवर्षीय साहसी बालिकेचे नाव मुग्धा राजेश मयेकर आहे.
‘महावितरण’ मधील सहा कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत लाक्षणिक उपोषण
बृहन्मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रथम प्रतिसादक प्रशिक्षण घेतल्यामुळे समयसूचकता दाखविता आली आणि वेळ वाया न घालविता जीवीतहानी रोखता आली, असे मुग्धाची आई मीनल मयेकर यांनी सांगितले. सदनिकेतील लहान मुले आगपेट्यांशी खेळत असताना बिछान्याने आणि पदड्यांनी पेट घेतला. वातानुकुलिक यंत्रणा, छताच्या प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. खेळत्या हवेमुळे सदनिकेतील ज्वलनशील साहित्याने पेट घ्यायला सुरूवात केली. आग लागताच इमारतीतील धोक्याची घंटा देणारा ‘फायर अलार्म’ वाजू लागला. फायर अलार्म ऐकू येताच याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या मुग्धा मयेकर या पहिलीत शिकणा-या अवघ्या ७ वर्षाच्या चिमुरडीने तातडीने आईकडे धाव घेतली. इमारतीत काहीतरी दुर्घटना घडल्याचे आईला सांगितले. त्यानंतर मुग्धाच्या आईने खातरजमा केली असता २३ व्या मजल्यावरील सदनिकेला आग लागल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम अग्निशमन दल नियंत्रण कक्षास दूरध्वनीवर घटना कळविली.
एस्.टी. महामंडळाच्या १६ मुख्य बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे व्यवस्थापकीय संचालकांना सादर
बृहन्मुंबई महापालिकेच्या १९१६ या आपत्कालीन मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधत घटनेची माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने तात्काळ सदर घटना संबंधित मदतसेवांना कळवून घटनास्थळी आवश्यक मदतकार्य कमीत कमी वेळात उपलब्ध करुन दिले. दरम्यानच्या काळात मीनल यांनी आपल्या घराचा विद्युत पुरवठा, गॅस पाईपलाईन पुरवठा तातडीने बंद केला. आजुबाजूच्या सदनिकाधारकांनाही आगीची दुर्घटना लक्षात आणून देत त्यांनाही विद्युत पुरवठा, गॅस पाईपलाईन पुरवठा बंद करण्यास सांगितले. त्यानंतर आपल्या दोन मुलींसह आणि शेजाऱ्यांना घेऊन त्या पायऱ्यांनी इमारतीतून खाली उतरल्या. त्याचबरोबर त्यांनी इमारतीतील इतरांना पाय-यांचाच वापर करण्याचे आणि लिफ्टचा वापर न करण्याचेही सांगितले.
महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत- नाना पटोले
याच गृहसंकुलात राहणारे नागरी संरक्षण दलाचे विभागीय क्षेत्राधिकारी गोविंद झा, रहिवासी राज ब्रम्हे यांनी घटनास्थळी धाव घेत लिफ्ट यंत्रणा पूर्णपणे बंद केली. क्षणाचाही विलंब न करता इमारतीतील इतर रहिवाशांना धीर देत आपात्कालीन घटनेवेळी काय करावे आणि काय करू नये याची माहिती देत त्यांना धावाधाव न करता पायऱ्यांवरून शांतपणे खाली उतरविले. दरम्यान, अग्निशमन दलाने अवघ्या अर्धा तासात आग आटोक्यात आणली.
मीनल मयेकर म्हणाल्या, आमच्या सोसायटीत महापालिकेच्या सौजन्याने आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण आयोजित केले होते. आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत देण्यात आलेल्या प्रशिक्षणामुळेच इमारतीमधील रहिवाशी न घाबरता परिस्थितीला शांतपणे सामोरे गेले. कोणतीही मोठी हानी झाली नाही. नागरिकांनी आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घ्यावे. आपत्कालीन संपर्क क्रमांक जवळ बाळगावे असेही त्यांनी सांगितले.
