डोंबिवलीकर ‘नांदी’रंगात आणि नाट्यसंगीतात रंगले!
डोंबिवली दि.११ :- तबलावादक धनंजय पुराणिक, संवादिनी वादक विनोद पुराणिक यांचे वडील दिवंगत विष्णुपंत काशिनाथ पुराणिक आणि ज्येष्ठ संपादक, नाटककार दिवंगत विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डोंबिवलीत ‘नांदीरंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वेश सभागृहात झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात संगीत शाकुंतल नाटकातील पंचतुंड नररुंड या नांदीने झाली. नंतर संगीत सौभद्र,संगीत शारदा, मानापमान विद्याहरण, स्वयंवर, संशयकल्लोळ तसेच मा. कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या संगीत कान्होपात्रा नाटकातील व विद्याधर गोखले यांच्या मदनाची मंजिरी व जय जय गौरीशंकर या नाटकातील नांदी सादर झाल्या.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १७७ कोटींहून अधिक रुपयांची मदत
शुभदा आणि श्रीकांत दादरकर संचालित विद्याधर गोखले संगीत-नाट्य प्रतिष्ठान ठाणे शाखेच्या नाट्य संगीत पदविकाप्राप्त गौरी फडके, भगवंत कुलकर्णी, अभिजीत कासखेडीकर, अनुजा वर्तक, आसावरी पुराणिक, प्राची जोशी, अनुराधा केळकर, अश्विनी जोशी, मानसी मराठे, शर्वरी गोखले, स्मृति काणे, भाग्यश्री पर्वतीकर, सायली काजरोळकर, अश्विनी पुरोहित, आकांक्षा आठवले, सीमा गोडबोले या गायकांनी नांदी आणि नाट्यपदे सादर केली.
यात वद जाऊ कुणाला, स्वकर शपथ, मनरमणा, ऋतुराज आज, लेवू कशी वल्कला, जय गंगे भागीरथी, लागी करेजवा, प्रियकरा नसे या नाट्यपदांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता दीक्षित यांनी केले. हा संपूर्ण कार्यक्रम अपर्णा हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झाला. संगीतसाथ धनंजय पुराणिक (तबला) , विनोद पुराणिक ( ऑर्गन) यांची होती. शुभदा पावगी व श्री.श्रीकांत पावगी, डॉ. सुनील भालेराव, डॉ. चिन्मय पतकी, हेरंब म्युझिकल फाउंडेशनचे रवि पोंक्षे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
