Thursday, August 20, 2026
Latest:
मनोरंजन

सुबोध भावे आता आरजेच्या भूमिकेत; रेडिओ मिर्चीवर रंगणार ‘असा घडला महाराष्ट्र’चा रंजक प्रवास!

पुणे:

महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास, संस्कृती आणि राज्याच्या जडणघडणीतील अपरिचित व रंजक कथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘रेडिओ मिर्ची’च्या वतीने ‘असा घडला महाराष्ट्र’ या विशेष रेडिओ शोची घोषणा करण्यात आली आहे. लोकप्रिय आणि अभ्यासू अभिनेते सुबोध भावे यांच्या दमदार आवाजात आणि ओघवत्या निवेदनातून हा कार्यक्रम श्रोत्यांच्या भेटीस येत आहे.

येत्या २४ ऑगस्टपासून हा शो सुरू होत असून, नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि नागपूर या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते १० आणि संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत प्रसारित केला जाईल. (शनिवार आणि रविवारच्या वेळा लवकरच जाहीर करण्यात येतील).

विधि महाविद्यालय रस्त्यावरील ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’च्या कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात या नव्या शोची औपचारिक घोषणा करण्यात आली.

“आपली नाळ मातीशी पुन्हा जोडण्याचा हा प्रयत्न” – सुबोध भावे

या प्रसंगी बोलताना सुबोध भावे म्हणाले, “कुटुंबातील जुन्या गोष्टींमधून जशी नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, तसाच महाराष्ट्र हा आपला मोठा परिवार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याच्या इतिहासातील अनेक माहिती नसलेले पैलू समोर येतील. चेहरा न दाखवता केवळ आवाजाच्या जोरावर श्रोत्यांना खिळवून ठेवणे हे आरजेचे काम आव्हानात्मक आहे. मात्र, रेडिओ मिर्चीच्या टीमने यासाठी मोठा अभ्यास करून अत्यंत विश्वसनीय माहिती संकलित केली आहे.”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले की, “शिवरायांनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची शिकवण दिली. केवळ जयंती साजरी करण्यापेक्षा त्यांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे. आपली मराठी भाषा बोलण्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. या शोद्वारे समाजात सकारात्मकता पसरवण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

हॉलिवूडच्या भूमीत मराठी सिनेमाचा डंका: सॅन होजे येथे ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न

नकारात्मकतेच्या काळात सकारात्मकतेचा संदेश

रेडिओ मिर्चीचे व्यवसाय प्रमुख जयेश पाटील यांनी सांगितले की, सातत्याने येणाऱ्या नकारात्मक बातम्यांच्या काळात महाराष्ट्रातील चांगल्या आणि प्रेरणादायी गोष्टी जनतेपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने सुबोध भावे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे.

‘लोकमान्य मल्टिपर्पज’चे विभागीय प्रमुख सुशील जाधव यांनी संस्थेच्या २० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच बेळगाव आणि महाराष्ट्राच्या सीमाभागाशी संबंधित ऐतिहासिक बाबींचाही या शोमध्ये समावेश केला जाईल, अशी माहिती दिली.

राजधानीत मराठी चित्रपटांचा नवा अध्याय: खासदार विनोद तावडे यांच्या हस्ते ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवा’चे भव्य उद्घाटन

दिग्गज संस्थांचे सहकार्य

या नाविन्यपूर्ण उपक्रमाला लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) आणि चंद्ररूप क्लॉथ स्टोअर्स यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

कार्यक्रम प्रसंगी रेडिओ मिर्चीचे प्रादेशिक प्रमुख पुनीत केळकर, आरजे विभागाच्या प्रमुख स्मिता रणदिवे, राहुल गजबार आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन आरजे निमी यांनी केले, तर आभारप्रदर्शन स्मिता रणदिवे यांनी मानले.