Thursday, August 20, 2026
Latest:
ठळक बातम्या

देशात ‘स्किन डोनेशन’ अन् ‘स्किन बँकिंग’ व्यवस्था सुदृढ करा; राज्यसभा खासदार विनोद तावडे यांची संसदेत मागणी

नवी दिल्ली:

गंभीररीत्या भाजलेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी देशात ‘स्किन डोनेशन’ (त्वचादान) आणि ‘स्किन बँकिंग’ (त्वचा बँक) ही यंत्रणा अधिक सक्षम आणि सुदृढ करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्रातील राज्यसभेचे खासदार विनोद तावडे यांनी संसदेत केले. राज्यसभा विशेष ध्यानाकर्षण प्रस्तावाद्वारे त्यांनी सरकारचे या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले.

मातोश्रींच्या निधनानंतर झाली जाणीव

खासदार विनोद तावडे यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी त्यांच्या मातोश्रींच्या निधनादरम्यान या विषयाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शरीर मोठ्या प्रमाणावर भाजते, तेव्हा दान केलेली त्वचा अत्यंत संजीवनी ठरते. ही त्वचा संसर्ग रोखण्यासाठी आणि शरीरातील द्रवाचा होणारा ऱ्हास कमी करण्यासाठी मोलाची मदत करते.

दिल्लीतील ‘मराठमोळा सुभेदार’ भाजपा राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांचा आज वाढदिवस: राजकीय धुरंधर व कुशल रणनीतीकाराचा गौरवशाली प्रवास

त्वचादानाबाबतच्या महत्त्वाच्या बाबी:

वेळेची मर्यादा: व्यक्तीच्या मृत्यूनंतर ६ तासांच्या आत त्वचादान करता येते.

मॅचिंगची गरज नाही: त्वचादानासाठी ब्लड ग्रुप (रक्तगट) किंवा टिशू मॅचिंगची कोणतीही आवश्यकता नसते.

रचनेवर परिणाम नाही: त्वचादानामध्ये केवळ त्वचेचा वरचा अत्यंत पातळ थर घेतला जातो; यामुळे मृतदेहाच्या बाह्य स्वरूपावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.

दीर्घकालीन साठवणूक: दान केलेली त्वचा विशेष प्रक्रियेद्वारे ५ वर्षांपर्यंत सुरक्षित ठेवली जाऊ शकते.

सद्यस्थिती आणि केंद्र सरकारचे प्रयत्न

‘ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन अँड टिशू ॲक्ट १९९४’ अंतर्गत त्वचादानाची कायदेशीर तरतूद उपलब्ध आहे. केंद्र सरकारने ‘नॅशनल ऑर्गन अँड टिशू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ (NOTTO) च्या माध्यमातून अवयव आणि उती (टिशू) दानाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कौतुकास्पद पावले उचलली आहेत. मात्र, आता त्वचादानाबाबत समाजात व्यापक जनजागृती निर्माण करणे आणि ‘एकात्मिक राष्ट्रीय स्किन रिट्रीव्हल मेकॅनिझम’ विकसित करणे काळाची गरज बनली आहे.

माजी विद्यार्थी ते मुख्य अतिथी… विनोद तावडेंचा साठ्ये कॉलेजमधील ‘तो’ अभिमानाचा क्षण!

खासदार विनोद तावडे यांनी केलेल्या प्रमुख मागण्या:

१. विशेष फ्रेमवर्क: त्वचादानासाठी विशेष तरतुदींसह एक व्यापक राष्ट्रीय फ्रेमवर्क तयार केले जावे.

२. स्किन बँकिंग सुदृढीकरण: देशभरात त्वचा बँकांची पायाभूत रचना आणि सुविधा अधिक मजबूत केल्या जाव्यात.

३. नेटवर्क निर्मिती: एकात्मिक स्किन रेफरल आणि ट्रान्सपोर्ट नेटवर्कची स्थापना करण्यात यावी.

४. लॉजिस्टिक्स सक्षमीकरण: स्किन चेन लॉजिस्टिक्स (त्वचा वाहतूक व साठवणूक साखळी) अधिक सशक्त करावी.

५. राष्ट्रीय जनजागृती: देशभरात त्वचादानाबाबत व्यापक मोहीम राबवून लोकांमध्ये पसरलेले गैरसमज दूर केले जावेत, जेणेकरून गरजूंना वेळेत त्वचा उपलब्ध होऊ शकेल.