जंतर-मंतरवर नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी घुमला ‘दिबां’चा जयघोष; हजारो भूमिपुत्रांची उपस्थिती
नवी दिल्ली:
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज, ५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर भव्य शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या आंदोलनात नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांतील हजारो भूमिपुत्रांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला हक्क मागितला.
‘सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती’ आणि ‘पाच जिल्ह्यांतील आगरी भूमिपुत्र संघटना’ यांच्या वतीने या ‘चलो दिल्ली’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. “दिबांची वारी, दिल्लीच्या दारी” आणि “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त आणि फक्त दि. बा. पाटील साहेबांचेच” यांसारख्या घोषणांनी जंतर-मंतरचा परिसर दणाणून सोडला.
सकाळी १० वाजल्यापासूनच आंदोलक मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झाली होती. अनेकांच्या हातात दि. बा. पाटील यांची छायाचित्रे आणि घोषणा असलेले फलक आणि झेंडे होते. आंदोलकांनी केंद्र सरकारकडे आपली मागणी तातडीने मान्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी उपस्थित नेत्यांनी आणि आंदोलकांनी दि. बा. पाटील यांच्या योगदानाचा गौरव केला. प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या या महान नेत्याचे नाव विमानतळाला देणे हाच खरा त्यांचा सन्मान असेल, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
प्रमुख मागण्या:
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ करावे.
भूमीपुत्रांच्या जमीन अधिग्रहणाबाबत योग्य मोबदला आणि पुनर्वसन करावे.
विमानतळ प्रकल्पात स्थानिकांना रोजगार आणि विकासाच्या संधी मिळाव्यात.
आंदोलकांनी त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. आजच्या या भव्य प्रदर्शनाने नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, केंद्र सरकार आता यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

