वर्षभरात १८,८४२ स्वयंसेवकांचे प्रशिक्षण पूर्ण; जनसांख्यिकी असंतुलन, अमली पदार्थांचा प्रभाव आणि राममंदिर दानप्रकरणावर संघ बैठकीत चिंता
बेलगावी (कर्नाटक) :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक रविवारी कर्नाटक मधील बेलगावी येथे यशस्वीरीत्या संपन्न झाली. तीन दिवस चाललेल्या या बैठकीत देशभरातील जनसांख्यिकी असंतुलन (डेमोग्राफिक इमबॅलन्स), तरुणांमधील अमली पदार्थांचा वाढता प्रादुर्भाव आणि अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील दानपेटीच्या रकमेत झालेल्या कथित अनियमिततेच्या प्रकरणावर सखोल चर्चा करण्यात आली.

या बैठकीस सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले यांच्यासह देशभरातील २२६ प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीनंतर संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या संदर्भातील माहिती दिली.
१८,८४२ स्वयंसेवकांनी घेतले प्रशिक्षण; सप्टेंबरमध्ये ‘कमाल शाखा विस्तार’
या बैठकीत मार्च २०२६ नंतर झालेल्या विविध स्तरांवरील प्रशिक्षण वर्गांचा आढावा घेण्यात आला.
प्रशिक्षण वर्ग: या वर्षी देशभरात एकूण ८३ ‘संघ शिक्षा वर्ग’ आणि १२ ‘कार्यकर्ता विकास वर्ग’ आयोजित करण्यात आले होते.
सहभाग: एकूण १८,८४२ स्वयंसेवकांनी आपले प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. यामध्ये प्रामुख्याने शाखा संचालन, ग्रामविकास, कुटुंब प्रबोधन, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षण या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
शाखा विस्तार योजना: येत्या सप्टेंबर महिन्यात देशभरात व्यापक स्तरावर ‘कमाल शाखा विस्तार योजना’ राबवण्यावर बैठकीत एकमत झाले.
यासोबतच संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त जोडल्या गेलेल्या नवीन लोकांना सामाजिक कार्यात आणि ‘पंच परिवर्तन’ (सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वदेशी आणि नागरिक कर्तव्य) मोहिमेत सक्रिय करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
देशासमोरील आव्हानांवर मंथन: जनसांख्यिकी असंतुलन व ड्रग्जचा विळखा
बैठकीत देशातील विविध सामाजिक व राष्ट्रीय आव्हानांवर सखोल चर्चा झाली:
जनसांख्यिकी असंतुलन: आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर देशातील वाढत्या जनसांख्यिकी असंतुलनामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य आव्हानांवर संघाने चिंता व्यक्त केली.
अमली पदार्थांचे संकट: तरुणाईमध्ये वाढणाऱ्या ड्रग्जच्या विळख्याबद्दल संघाने तीव्र चिंता व्यक्त केली असून समाज नशामुक्त करण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्याची गरज अधोरेखित केली.
संत शिरोमणी रविदास जयंती: संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त देशभरात विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची योजना आखण्यात आली.
राम मंदिर दानपेटी गैरव्यवहारप्रकरणावर तीव्र दुःख आणि चिंता
अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी मंदिरातील दानपेटीच्या मोजणीत झालेल्या कथित अनियमिततेच्या घटनेवर संघाने बैठकीत तीव्र दुःख व्यक्त केले. सध्या या प्रकरणाची जी विशेष तपास पथक (SIT) आणि पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे, ती कायदेशीर कारवाई लवकरच निर्णायक टप्प्यावर पोहोचेल, असा विश्वास संघाने व्यक्त केला आहे.
भविष्यात अशी कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे जगभरातील कोट्यवधी रामभक्तांच्या आस्थेला तडा जाईल, याची कडक खबरदारी तीर्थक्षेत्र न्यासाने (ट्रस्ट) घ्यावी, अशी अपेक्षाही संघातर्फे या वेळी व्यक्त करण्यात आली.
