Wednesday, July 8, 2026
Latest:
सामाजिक

​दि. बा. पाटील विमानतळ आंदोलन: कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना नगरसेविका संगीता म्हात्रे सह अनेक शिवसेना महिला नेते आंदोलनस्थळी

कल्याण-डोंबिवली:
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी आगरी समाज आणि भूमिपुत्रांचे आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. या न्याय्य आणि अस्मितेच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नगरसेविका संगीता म्हात्रे यांनी कल्याण ग्रामीण शिवसेना महिला आघाडी पदाधिकारीसह आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला.

“हा लढा केवळ नावाचा नाही, तर अस्मितेचा”
​आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना संगीता म्हात्रे म्हणाल्या की, “हा लढा केवळ एका नावासाठी नसून आपल्या इतिहासाचा, स्वाभिमानाचा आणि भूमिपुत्रांच्या अस्मितेचा आहे. आपल्या समाजासाठी माननीय दि. बा. पाटील यांनी दिलेल्या ऐतिहासिक योगदानाचा सन्मान होणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे हा लढा प्रत्येक आगरी बांधवाने आपला स्वतःचा समजून एकजुटीने लढणे अत्यंत आवश्यक आहे.

 

रुग्णालयात जाऊन रश्मिता ताई पोपाटे यांच्या प्रकृतीची विचारपूस

​आंदोलनादरम्यान समाजहितासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या आणि ठाम भूमिका मांडणाऱ्या आदरणीय रश्मिता ताई पोपाटे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नगरसेविका संगीता म्हात्रे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. “समाजाच्या हक्कासाठी रश्मिता ताईंनी घेतलेली भूमिका निश्चितच प्रेरणादायी असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

​या प्रसंगी संगीता म्हात्रे यांच्यासोबत कल्याण ग्रामीण शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी इंदिरा भोईर, चंद्रभागा म्हात्रे आणि दीपा पाटील आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.

नवी मुंबई विमानतळ नामकरण: कल्याण-डोंबिवलीतून भाजप नगरसेविका डॉ. सुनिताताई पाटील यांचा प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा

आगरी समाजाला एकत्र येण्याचे आवाहन

​या प्रसंगी​ संगीता म्हात्रे यांनी संपूर्ण आगरी समाजातील बंधू-भगिनींना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. “हा लढा कोणत्याही एका व्यक्तीचा नसून आपल्या संपूर्ण समाजाच्या स्वाभिमानाचा आहे. त्यामुळे अंतर्गत मतभेद विसरून सर्वांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, एकत्र यावे आणि आपल्या हक्कासाठी ठामपणे उभे राहावे. आपल्या एकजुटीतच आपल्या समाजाची खरी ताकद आहे,” असे आवाहन त्यांनी शेवटी केले.